Thursday, December 16, 2010

धुकं

आय. आय. टी. मधल्या थंडीची बातच काही और होती... सकाळी उठायचो तेव्हा चहूकडे धुकंच धुकं असायचं... त्याचा तो ओला, उनाड वास...! फुफ्फुसं फाटेपर्यंत श्वास घ्यावा अन तो वास उरात भरून ठेवावा, असं काहीतरी 'म्याड' सारखं वाटायचं... त्या धुक्यामधला, सकाळचा, M .T .चा चहा उभ्या आयुष्यात विसरेन असं वाटत नाही...

अन ते वेडं धुकं... ते दिवसभर तसंच राहायचं... एरवी तापवणारा सूर्य, त्या धुक्यामधून अगदी चान्दोबा सारखा दिसायचा... त्यातनं आय. आय. टी. मधली असंख्य झाडं, चित्रविचित्र मजेदार सावल्यांसारखी भासायची... आणि कुठल्या कुठल्या पक्ष्यांचे मंजुळ आवाज... सारं कसं Imaginary जगात वावरल्यासारखं...!

रात्री 'प्रतिबिंब'च्या नाटकाच्या practice ला तर त्याची हजेरी ठरलेलीच... अशाच एका रात्री, त्या दाट धुक्यातून, तालामीनंतर रूमवर जाताना अचानक काहीतरी वाटून गेलं... अन... ते गूढ, गहिरं, magical धुक्यातल एक 'म्याड' स्वप्नं, तेवढ्याच 'म्याड' अशा Yanni च्या "One Mans Dream" च्या background वर , व्यक्तही करून टाकलं...





Thursday, October 21, 2010

पाचोळा...

रस्ताभर, दूर दूर...
पसरलेला पाचोळा,
स्वतःमध्ये स्वतःलाच ,
विसरलेला पाचोळा...

पान एक, पिवळं धमक,
डुलत डुलत... झुलत झुलत...
झाडावरून जमिनीवर...
हळुवार...!

दुसरं पान... थोडं लहान...
बरंच हिरवं... पिवळं थोडं...
थोडं शहाणं... बरंच वेडं...
रमत गमत... गम्मत बघत...
मधेच गिरकी... थोडी तिरकी...
गाणं गात... आपल्याच मनात...
होऊन स्वार, वाऱ्यावरती...
अलगद... धरेवरती...!

पान तिसरं... हिरमुसलेल...
स्वतःलाच... विसरलेलं...
उदास उदास,
ना कसलीच आस...
गरगर... भरभर...
गालावरच्या आसवागत......
स्वतालाच, वेडावत...
टपकन जमिनीवरती...!
...

एक एक... अशी अनेक...
पाहता पाहता, रिता रिता,
रस्ता सारा भरून गेला...
पान पान, रितेपणा...
झाडाकडे उडत गेला...

घेऊन आता फांद्या साऱ्या,
वेड्या वाकड्या...
बोडक्या बोडक्या,
झाड घालतंय स्वतःलाच वेटोळा...

रस्ताभर, दूर दूर,
पसरलेला पाचोळा,
स्वतःमध्ये स्वतःलाच,
विसरलेला पाचोळा...

Monday, June 7, 2010

डायलॉग म्हणजे काय रे भाऊ ?

(आत्तापर्यंत केलेल्या नाटकांमधले काही हिट आणि काही मला आवडलेले डायलॉग...)


V. I. T.


गृहस्थ: अहो, जरा पलीकडे जाऊन उडी मारलीत तरी चालेल. काये, इथे येणारे बरेच जण तिकडूनच आत्महत्या करतात.
तो: च्यायला, भाड्या ... तुला काय करायचं ?
गृहस्थ: (लिहून घेत) भ ... भ ला काना भा... भाड्या...
तो: (आश्चर्यचकित अधिक चिडलेला)
गृ: नाही, त्याचं काये.... इथे जीव द्यायला येणारे माझ्याशी काय काय बोलतात ते लिहून ठेवत असतो मी... नंतर अभ्यास करायला...

('आयला' , S.E. सुमन)
*****************************

कारकून: तुम्ही कडक आहात पण देवदूत आहात...
सगळे: हो, हो... तुम्ही देवदूत आहात....
इव्हान: पाहिलंस.... मी यांचा बाप आणि ही माझी मुलं... मी... मी या गरिबांना वर काढलंय... माझी ही हकीकत पिढ्यानपिढ्या सांगितली जाईल....
----

पत्रकार: आपल्या कनिष्ठांच्या बायकांचा उपभोग घेणारया वरीष्ठान्पैकी तुम्ही एक आहात...
इव्हान: प्सेलोनिमोव...
प्से: चल चालता हो इथून...

('एक ओंगळ घटना' , S.E. पुरू)
********************************

विवेक: आपल्याभोवती समजुतींच धुकं तयार करतो आपण... स्पष्ट, स्वच्छ काहीच दिसत नाही... आणि आपल्याला नकोच असतं ते...

('प्सुनामीच्या निमित्ताने' , S.E. फिरो)
********************************

अहो काळे कल्पना करा.... की शेजारी एक सुंदर स्त्री आंघोळ करतीये... साबणाचा फेस तिच्या रंध्रारंध्रात शिरतोय....
----------------
तुम्ही झिंगे खाता का झिंगे...?

('Tax Free', T.E. सुमन)
********************************

आदित्य: आणि मग नटवर्य केशवराव दाते... किंवा काकाजी...
नेहा: किंवा माई भिडे...
राहुल: ... ए, मिळाला असता का रे करंडक ?
----------

मुकुंदा: दूर कुठेतरी लांब टेकडीवरच एक कौलारू घर... पश्चिमेकडून येणारी संध्याकाळ त्या घराला खायला येतेय... घरासमोरच्या अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलाय... सडा...
घरातली सुवासिनी तुळशीला नमस्कार करतीये... ( with action :))... इतक्यात..
इतक्यात.... झाडामागून येणारा तो जांभळा साप... फुस्स...
इकडून सुवासिनी...... तिकडून साप....
सुवासिनी... फुस्स....

('अशाच एका संध्याकाळी', T.E. पुरू)
*****************************************

वासू: गेल्या तीन वर्षात एकाही बक्षीस नाही...
रंगा: काय ?
वासू: सोडलं आपण अजून...
-------------

वासू: मी पाचवीत होतो तेव्हा ती दुसरीत होती... आणि मी दहावीत होतो तेव्हा ती बारावीत...
------------

रंगा: काये... पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलीशी बोलतोय ना..
सुमी: का ?
रंगा: मी रमणबाग शाळेत होतो ना...

('सदा कदाचित', T.E. फिरो)
***********************************************

सौ. साठे: अहो... सांगते काय... आमचा कुत्रा... चांगला रोजच्यासारखा संध्याकाळी सातच्या बातम्या बघत होता... तसे दोन पाय कोचावर आणि वारला...
श्री. साठे: कुत्र्यांचा हार्टफेल होतो का हो ?

('सांत्वन' , B.E. सुमन)
**********************************************

आजोबा: रिक्षा? अहो रिक्षानी फारसा फिरत नाही मी... म्हणजे काये... तो ड्रायव्हर... तो आपला पुढे... आपण असे मागे..... बसमध्ये कसं, माणसं असतात आजूबाजूला... जरा बरं वाटतं...
------------------

प्रोफेसर: तर थोडक्यात हे असं मिस्ड कॉलनी कटवतात....
आ: अहो अजबच आहे हे प्रकरण... माझं बघा... आज सकाळी फोन आला होता... चांगलं दहा पंधरा मिनिटं बोललो... आणि मग म्हटलं त्याला... की बाबा रे... wrong number आहे...
प्रो: अहो काय सांगताय काय...?
आ: ... .... ह... तेवढंच... दहा मिनिटं बोलायला मिळालं ना.... कुणीतरी....
---------------------

(विष्णूसहस्रनामाच्या चालीत, शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर जोर देत)

accost to approach, accolade an honor |
acquiesce to comply passively, acrid like acid ||

... शब्दसहस्रनाम...!!
------------------------

आजोबा: पेढे घ्या पेढे...
प्रोफेसर: अहो पण झाला तरी काय ?
आजोबा: नातू झाला...!!
प्रो: व्वा..
आजोबा: अगदी आज्जीवर गेलाय हो...
प्रो: अहो पण सांगून जायचं ना... मी मात्र तुमच्यावर रागावलोय ....

('एका कथेची गोष्ट', B.E. पुरू)
**********************************************************************

तो: तुला नाही असं कधी वाटत... की प्रचंड चिडावं ?
ती: वाटतं ना...
तो: कधी ?
ती: मला कुठेतरी लवकर पोहोचायचं असतं... मी अशी गाडीवरून जोरात जात असते... आणि सामोर लाल लाईट लागतो.... तेव्हा...
तो: ...
ती: मग मी काय करते माहितेय ?
तो: काय ?
ती: मी गाडी बंद करते... पेट्रोल वाया जातं ना....
तो: (चिडून, कोपरापासून नमस्कार करत) बर...
ती: अस्सा कसा रे तू ? मी एवढा जोक मारला आणि... ?
तो: ... हा जोक होता ? -- हा मात्र नक्कीच जोक होता....
------------------

आदित्य: नाही रे रव्या... तू करतोयस रे चांगलं... पण मला वाटतं तुला अजून तुझं character च नीट समजलेलं नाहीये...
तो: असं काही नाहीये रे... आणि मग...
दोघे: जरा Between the lines विचार कर ना...
तो: आणि मला त्या लाईन्स मध्ये सोडून तू मोकळा...!
----------------------

तो: आणि माझा collegue तर आत्तापासूनच एवढा काम करतोय की... मी एक दोन वर्ष नाटकं केली तर तोच माझा प्रोजेक्ट लीडर म्हणून येईल...
ती: चांगलंय ना मग... wavelength जुळेल तुमची...
-------------------

ती: "When you need something badly, the whole universe conspires to help you achieve that" Alchemist वाचलयस ना ?
तो: ... universe... ह... बहुतेक ती badly needed गोष्टच तुमचं universe होऊन जाते...!

('हो! पण...', B.E. फिरो)

*************************

आजोबा: तुम्हाला श्रीखंडाची गोळी आवडते का हो ?

('मृगजळ', सुमन)


*********************************************************************************


I. I. T.


काशा: सगळ्या जगानं भजी खाल्ल्यात आणि त्याचं अपचन मला झालंय असं वाटतंय रे...
----------

माधव: पिसाळलेली anti -aircraft गन झाली होती नाकाची.... मी तर शिंकतच बोलत होतो... एक शिंक, म्हणजे हो... दोन म्हणजे नाही... तीन म्हणजे समोरच्या फुटपाथवरून कोण चाललीये रे?
-----------

डॉक्टर: अहो... उ उ केलंत तर how am I to understand ?
जीभ बघू...
काशा: आ...
डॉ: वा... इकडून फुफुस्ससुद्धा दिसतायत मला यांची...
----------

माधव: अहो तुम्ही गोळी याच्यावर मारलीत... पण ती तर छपराला लागली...
डॉ: अहो... रेंज वाईड आहे माझी...!

('एकेकाचे आजार', M.Tech पहिला गणपती)
*********************************************

महाडकर: लोपल्या का तारका... लोपल्या का तारका....
दादू: अहो महाडकर... जरा खारका जुळतायत का बघा यमक म्हणून...
-------------

दादू: आहाहाहा महाडकर... येतील का हो करायला कविता मला ज्या ऐकून जनसागराच्या वरच्या थरावर येतील भावनांच्या सोन्याचे हिमालय...!!!
---------------

पण तांबे साहेबांच्या कपाटाला तर टाळा आहे... तर मी काय ते फोडू...?
----------------

अहो कोकणातला तांबडा चीरा आहे हा... तुमच्या घाटावरची भुसभुशीत माती नाही....

('सदू आणि दादू', M .Tech . प्रतिबिंब)
**********************************************************************

ती: कित्ती कित्ती हुशार आहात हो तुम्ही... वशिला असता ना.......

(तो आमेन वाला डायलॉग कुणाला आठवतोय का??)

('खुर्च्या... भाड्याने आणलेल्या'- एक ननाट्य, M .Tech . प्रतिबिंब)
*********************************************************************

प्रल्हाद (शाळेतला मुलगा): अगं असचं असतं देवासामोरच लग्न... ताडफोडीच्या जंगली जमातीत असंच करतात लग्न...
----------

शोभाचे बाबा: नाव काय रे तुझं?
प्र: प्रल्हाद मार्तंड किसमिसे...
तुमचं?
बाबा: हिरण्यकश्यपू... तुला काय करायचं...
आमच्या शोभाला हनिमूनला घेऊन जाणार होतास म्हणे तू...
प्र: हो... म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत... आणि सोबत खाऊचा डबा, पाण्याची बाटली...

('जेथे जाते तेथे...' दुसरा गणपती)
*******************************************

सौ: तब्येतीकडे बघून म्हनल का कुनी.... तालमीत जातं ते... आन भूक त येवडी... सकाळी एवढे, एवढे चार पातेली पोहे हानलेत अन म्हनं भूक लागली...
---------------

राऊ: ए... तू हाक मारतोस, की मी मारू ?
--------------

सरपंच: काय नाय ते जरा लेगात पेन आहे...
कमळी: आक्के... पेन म्हंजी ते खिशात असतंय ते नवं?
--------------

कमळी: त्याच्या ह्या कानापासून त्या कानापर्यंत फित्त बांधलीया...
-----------------

पाटील: बुर्रर्र......
-------------------

कमळी: आर ए मदन्या... काल ते राउला पायतानाचा हार घातला त्यातला एक पायतान माज्या बाचं हाये... तेवढं जरा घरला आणून दे की....

('धिंड', दुसरे प्रतिबिंब)

Saturday, May 22, 2010

टेन्शन

या कवितेतील कल्पना, घटना,
तसेच पात्रे काल्पनिक आहेत
आणि केवळ मनोरंजन म्हणून बनवलेली आहेत
त्यांचा कोणत्याही जीवंत व्यक्तीशी किंवा
प्रसंगाशी कोणताही संबंध नाही
आणि असल्यास तो केवळ योगायोग समजावा
कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाच्या भावना दुखावातील
असा विचार या काव्यनिर्मितीच्या मागे नाही
:D






Monday, May 3, 2010

कर्त्तव्य

११ वी असताना महाविद्यालयाच्या 'परशुरामीय'मधे प्रसिद्ध झालेली कथा....




Thursday, April 15, 2010

Wednesday, February 17, 2010

...

usually असं कधी होत नाही
की 'साराभाई' पहिल्यावारही मूड डाउन रहावा,
तेहि निवांत सुट्टीच्या दिवशी ...

लिहावसं तर वाटत नाहीये
मग, तरीही मी का लिहितोय ?... माहित नाही.

कविता ? छे ... यमक जुळवायला शब्द सुचावे लागतात ...
इथे तर मनात पक्का विचारच नाहीये,
शब्द सुचणार कसे?
विचारांची तर Brownian motion सुरु आहे मनात ...

मगाशी एकदम जाणवलं ...
एवढ्या सगळ्या शरीराला रक्त पुरवणार ह्रदय
केवढ शक्तिशाली असतं ते ...
external जाम मारतोय असं कळल्यावर
oral ला जाताना वाटायचं तसं ...
किंवा अंधाऱ्या, खोल विहिरीत डोकावल्यावर वाटतं तसं ...

मग हृदयातली ती धकधक, मस्तकातल्या शिरेत जाणवली
पित्त खवळल्यासारख रक्त उसळल ...
सिग्नलला थांबलो असताना,
शेजारचा रिक्शावाला पचकन थुंकतो, तेव्हा वाटतं तसं ...
लहानपणापासून शिकलेल्या सगळ्या शिव्या आल्या तोंडात ...

मग का कोण जाणे ...
पण एकदम homesick वाटलं,
आजुबाजुला मित्र असतानाही ...
उगाच फोन फिरवला ...
दोन तीन मिनिटं ...
माहित नाही कसं काय,
पण अगदी normal बोललो ... नेहमीसारखं ...

मग वाटलं ...
एखाद्या निरभ्र संध्याकाळी,
अचानक, हा हा म्हणता काळेकुट्ट ढ़ग दाटून यावेत;
सोसाट्याचा वारा सुटावा ...
IIT मधल्या sand storm सारखा ...
आणि तरीही रणरणत्या उन्हाचे चटके जाणवावेत,
... मोहित टाकळकरच abstract नाटक पहिल्या सारखं ...

ही उदासीनता तर वाटत नाही
कारण किशोरीताईंच्या स्वरात ती पाझरु लागते ...
किंवा Yanni च्या सुरांत ती विरघळते ...
आज मात्र One Man's Dream इतकं विरक्त का ?

आता ... आता तर असं का वाटतय की
ही series converge होवू लागलिये ...
आणि मला नकोय ते ...
कितीही वेळा नाकारलं,
तरी का हा विचार परत परत वर येऊ लागलाय ...?

सव्वा वर्षांपूर्वी, तो प्रश्नार्थक, भविष्यकाळ होता ...
आत्ता तो उद्गारवाचक, वर्तमानकाळ आहे ...
आणि... आणि उद्या...
...
हंss... कधी ना कधी पुण्यातही हे होणारच होतं ...