Thursday, January 20, 2011

अपूर्वाई

एक अशीच संध्याकाळ, आकाशाची निरभ्र निळाई...

पश्चिमेचा पवन आणतो एक पांढराशुभ्र ढग, हळुवार...
आणि मार्गस्थ भास्कर त्याला लेववतो, भावनेची भरजरी किनार... तेवढ्याच, हळुवार !
दिनकराच्या चेहेऱ्यावरचं शेवटचं हास्यं, फिक्कट तांबूस... त्याचा केवढा प्रभाव...
अचानक त्या निळाईतल्या निरागस मेघावार होतो रंग-सुमनांचा वर्षाव...
आठवणींनी आणि स्वप्नांनी मोहोरतं त्याचं मन... आणि जन्मतो... एक जलद...
केवढा अलगद...!

आता हा बरसेल... संध्येला पडतयं एक इंद्रधनुष्यी स्वप्नं...
अन तो सहजसुंदर भाव, तिच्या मुखावर इवलीशी कळी उमटवून गेलाय...
पण, पण... भरजरी शालू नेसलेल्या, अन सहस्र रंगांनी सजलेल्या,
त्या संध्येच्या गालावरची गोड खळी पाहून...
सहजपणे तो मेघ तिच्या मागे मागे चालू लागलाय...
तिच्या नकळत, आणि... त्याच्याही...

...
...
...

उरलीये... उरलीये आता अथांग आकाशाची निरभ्र निळाई...
अन सोबतीला, त्या चित्रमय क्षणांची केवळ अपूर्वाई...!