Wednesday, July 27, 2011

बालभारती

पाऊस पडतो रिमझिम जेव्हा,
झाड वडाचे भिजून जाते;
गंध नव्याचा घेऊन पोटी,
पुस्तक भेटायला येते.

कव्हर त्याचे रेखिव खाकी,
रंगित स्टिकर अन त्यावरती;
घेऊन सारे धडे नि कविता,
हळूच हसते, बालभारती !

'फटका' इथला लागत नाही,
'गवतफुला'ही येथे परिमळ;
पण कधि 'गोड हिवाळया'मध्ये,
स्वप्नांचा होतो 'लाल चिक्खल'.

'स्मशानातले' लेवुन 'सोने',
'बुद्ध' येथला 'दर्शन' देतो;
'गर्वा'ने 'कोलंबस' इथला,
'तुतारी' फुंकुनी, गगन भेदितो.

रस्त्यावरची 'दमडी' इथली,
स्वप्नांची पांघरे 'पैठणी';
ज्ञान-तुक्याचे 'अभंग' गाते,
'मनु' येथली, आर्त विराणी...

क्षणांत काही, डोळ्यांमध्ये
आठवणींचे असंख्य मोती;
रेखिव खाकी बुराख्यामागे,
अलिप्त तरिही, बालभारती...

(आठवी नंतर पुस्तकाला कुमारभारती नाव असलं, तरी मराठीचं पुस्तक म्हटलं की बालभारती हेच नाव डोळ्यांसमोर येतं :-) )

Monday, July 25, 2011

एकम - मिलिंद बोकील

मिलिंद बोकील यांच्या एकम या कादंबरीतील काही निवडक संकलित भागाचं अभिवाचन. (मला मान्य आहे कि जरा जास्तच lengthy आहे, पण खूप सुंदर लिहिलंय !)

ज्याला कुणाला लिहायला आवडतं किंवा at least ज्याला कधीतरी, काहीतरी वाचल्यावर 'मी असं कधी लिहीन का?' असं वाटलं असेल त्या प्रत्येकासाठी...

१. काळं कि निळं ?
२. चहा कि कॉफी ?
३. थीम कि थीम्स ?
४. एकटेपणा - शाप कि वरदान ?
५. शाप = वरदान !
६. एकटेपणा
७. लेखक
८. लिखाण
९. एकम...

मनातलं अवकाश!

मळभ विरतं, दिसू लागतं
निरभ्र... आकाश;
दूर कुठे क्षितिजावरती,
मंदसा ... प्रकाश.

वारा नाही पण,
शहारणारा गारवा;
हवेमध्ये दवासारखा,
अनामिक गोडवा.

पिसासारखं हलकं, हलकं,
सहज... सावकाश;
नितळ... निराकार --
मनातलं अवकाश !