Wednesday, September 4, 2013

डोंगर आणि ढग




आकाशातले भले मोठ्ठे ढग,
कधी अचानक खाली येतात… 
उंच एकट्या डोंगराशी,
हळूच गप्पा मारू लागतात… 

उंच उंच डोंगरावरची,
उंच उंच झाडं… 
भल्या थोरल्या ढगांसमोर,
इवली इवली झाडं… 

सळसळणाऱ्या पानांमधून,
झाडं गलका करू लागतात… 
उधाणलेल्या वाऱ्यासंगे,
ढगांकडे हट्ट धरतात… 

फांदीवरचा उनाड कोकीळ,
हिरवं गाणं लिहू लागतो…      
बांबूंमध्ये घुमत वारा,
दडले सूर शोधू पाहतो… 

दूर दरीत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी,
मग डोंगराकडे धावत येतात… 
अन थेंबांचा ठेका धरत,
मोहरणारे सूर जुळतात…!!   

Saturday, June 29, 2013

ओंजळ

एकदा भल्या सकाळी,
अस्फुट स्वप्नील स्वरासारखं,
अनाहूतपणे तू माझ्या समोर यावस…
आणि नुकत्याच खुडलेल्या सुकुमार
फुलांनी भरलेली तुझी ओंजळ,
हलकेच माझ्या हाती रिती करावीस…

तुझ्या या कृतीनी मी पुरता
गोंधळलेलो असताना,
तू अलगद आपला पदर सारखा करावास…  
मी अजून गोंधळाव…
तुला कळू नये म्हणून,
उगाच फुलांकडे पाहावं …

"माझी फुलं"
जितक्या सहज ही फुलं दिलीस,
तितक्याच सहज तू विचारावस…
त्या नाजूक, नितळ फुलांनाही
लाजवेल इतकं निखळ हसावस…
मी स्तंभित होऊन तुझ्याकडे
बघत असता, 
तू हळूच पुन्हा म्हणावंस…
"माझी फुलं !"

ती सुकुमार फुलांनी भरलेली ओंजळ,
मी तुझ्या नाजूक हाती पुन्हा सोपवावी…
अन त्यातली दोन इवली फुलं,
तुझ्या डोळ्यात जाऊन दडावित…

वाऱ्याच्या  हळुवार झुळूकेसारखी
क्षणात अदृश्य झालेली तू…
आणि आपला अदृश्य सुगंध क्षणभरच मागे ठेवणारी…
… "तुझी फुलं !"
   

कविता-बिविता

तुम्ही म्हणे 'प्रतिभावंत',  कविता-बिविता लिहिता
वाचणारी उगाच चार टाळकी, स्वतःला कवी म्हणवता

असाल तुम्ही रिकामटेकडे, म्हणून ओळींवर ओळी खरडता
यमाकांना सोबत घेऊन, प्रतिमांना भरडता

चार ओळी लिहितात हो हे, यांना कुठं काय स्फुरतं ?
संदर्भासहित स्पष्टीकरण, कवितेत दुसरं काय उरतं ?

कविता-बिविता कसल्या करता,
वेळ असेल एवढा तर निबंध लिहा, चार पानी
चार ओळीत कसली करता,
कल्पनांची मनमानी ?

तुम्हाला नसतील हो,
पण आम्हाला व्याप असतात;
तुम्ही आपले फुकाचे, शब्दांचे खेळ करा….
एक फुकटचा सल्ला देतो,
आमच्यासाठी शाळेपासून,
कवितेपेक्षा धडा बरा !

Wednesday, June 26, 2013

कातरवेळ

फिकट झालेत पश्चिमेला, क्षितिजावरचे रंग
क्षितीज झालंय आभाळाच्या, निळाईमध्ये दंग

उरली आहे क्षितिजावरती, अंधुक एक पिवळी रेघ
क्षितिजाच्या पल्याड दूर, बरसणारा कृष्णमेघ

अंधाराच्या शून्यात क्षितीज, कुणाला एवढं शोधतंय ?
आर्त गहिऱ्या निळाईत, वेडं स्वतःच हरवतंय !

क्षितिजाच्या मनात उठलंय, चांदण्यांचं काहूर
अंतरात मंतरलेली… अनाहत हुरहूर

वाऱ्यासारखं सैरावैरा, मनासारखं अधीर झालंय
क्षितीज त्याच्या क्षितीजासाठी, केवढं  सैरभैर झालंय

शांतपणे रात्र दुरून, पाहतीये सारा खेळ
पांघरतीये क्षितिजावरती, गर्द निळी कातरवेळ…

Wednesday, June 12, 2013

मौन

शब्दांत सखे या, मौन तुला गवसावे
नभ भरलेले परी, निरभ्र तुज भासावे

वाळूवर उठली, असंख्य पाऊलचिन्हे
लाटांनी त्यांना, अंतरात ओढावे

पाण्यात तळ्याच्या, कित्येक पहुडल्या प्रतिमा
वेड्या तीरीपेने, सारे सोनेरी व्हावे

मी पिसासारखा, दिशाहीन उडताना
तू अलगद मजला, मुठीत ओढून  घ्यावे 

Tuesday, January 8, 2013

वेडा

(मंगळवारची दुपार. सुट्ट्या असल्यामुळे लेक्चर्स नाहीयेत. बाहेर जोरात पाऊस पडतोय. बाहेरच्या रूममध्ये दोघं अभ्यास करायचा प्रयत्न करतायत. Laptop वर गाणी चालू आहेत. नुकतंच नवीन गाणं सुरु झालंय.
.... 'घर थकलेले संन्यासी' ... )

ब : गाणी बंद कर रे....
अ : ...
ब : अरे, concentrate नाही करता येत ...
अ : आतल्या रूम मध्ये कर ना मग अभ्यास...
ब : ... अभ्यास ? .... Ph D  करतोय ना आपण ? ... Research !
अ : तेच ते... गाणं ऐकू दे रे... आत जा तू...
ब : आत झोप येते... च्यायला...
अ : म्हणूनच गाणी लावलीयेत न आपण ?
ब : मग, हे गाणं बदल ... मला झोप येते यानी...
(अ, ब कडे रोखून बघतो. या गाण्यानी झोप कशी येऊ शकते असा भाव.)
ब : ग्रेस, " 'माणसाला' कळणार नाही " असंच का लिहितात ?
अ : लिहितात ? ... (गाणं pause करतो.)
" सचिन तेंडूलकर चांगले 'खेळतात' " असं म्हणणाऱ्या माणसाला, तेंडल्या ही काय चीज आहे, हे माहिती असूच शकत नाही.
ब : ... "पु. ल. चांगला लिहितो"... अस म्हणतो का आपण?
अ : परवा अंतू बर्वा  ऐकताना काय म्हटला होतास ...?  "हा वेडा माणूस आहे यार"...
ब : तू वेडा आहेस !
अ : (हसतो)
ब : ?
अ : ... 'वेडा' हे श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे असं लिहिलं असतं, तर गोसावी सरांनी मारलं असतं का रे शाळेत ?
ब : (हसत) तू खरच वेडा आहेस !!
अ : ... आणि तू हृदयनाथ साठी ऐक न गाणं ... शब्द गेले खड्ड्यात... (गाणं सुरु करतो.)
(... "घर थकलेले संन्यासी" ...)
ब : अरे पण... 'घर थकलेले संन्यासी' काय अरे ? ही काय concept आहे?
अ : Maths मधल्या abstractions आवडतात न तुला ?
ब : Come  On ... त्या concrete concepts असतात !
अ : 'Complex Numbers' सारख्या concepts ना, तू concrete कसं म्हणू शकतोस ?
ब : कशाचीही कशाशीही comparison करतोयस अरे तू.... ग्रेस आणि Complex Numbers ?
अ : Abstract fundamental concepts digest करायला हृदयनाथ सारखी वेडी माणसं लागतात ... !
(... "हळुहळु  भिंत ही  खचते" ...)
ब : ... ... वेड लावतो यार हृदयनाथ ! ... ... ... तू... तू  absolutely वेडा आहेस...!
अ : (हसतो)
ब : हसतोस काय च्यायला, माझा सगळा टेम्पो घालवलास.... (उठून kitchen  कडे जातो)
अ : मला २ कप !
ब : अरे कधीतरी चहाला नाही म्हण....!!! आणि पाहिल्यापासुन लाव ते गाणं ... आणि चहा झाल्यावर लाव... आत्ता दुसरं लाव काहीतरी...
अ : जशी आज्ञा साहेब ....
ब : आयला, हा पाऊस कधी थांबणारे देव जाणे .... (चहा करायला लागतो)
(अ गाणं बदलतो.)
ब : अरे हे गाणं काये ??  पाऊस पडतोय एवढा बाहेर... चांगलं लाव ना काहीतरी....
अ : चांगलं... ...
ब : 'वाऱ्याने हलते रान' लाव रे ...
अ : (हसत) मी वेडा आहे ...!
ब : हो ! आणि मी ठार वेडा !!
(होघेही हसतात. पाणी उकळायला लागलंय. उकळणाऱ्या चहाचा वास.
... ... ... "वाऱ्याने हलते रान" ... ... ...)