Thursday, October 21, 2010

पाचोळा...

रस्ताभर, दूर दूर...
पसरलेला पाचोळा,
स्वतःमध्ये स्वतःलाच ,
विसरलेला पाचोळा...

पान एक, पिवळं धमक,
डुलत डुलत... झुलत झुलत...
झाडावरून जमिनीवर...
हळुवार...!

दुसरं पान... थोडं लहान...
बरंच हिरवं... पिवळं थोडं...
थोडं शहाणं... बरंच वेडं...
रमत गमत... गम्मत बघत...
मधेच गिरकी... थोडी तिरकी...
गाणं गात... आपल्याच मनात...
होऊन स्वार, वाऱ्यावरती...
अलगद... धरेवरती...!

पान तिसरं... हिरमुसलेल...
स्वतःलाच... विसरलेलं...
उदास उदास,
ना कसलीच आस...
गरगर... भरभर...
गालावरच्या आसवागत......
स्वतालाच, वेडावत...
टपकन जमिनीवरती...!
...

एक एक... अशी अनेक...
पाहता पाहता, रिता रिता,
रस्ता सारा भरून गेला...
पान पान, रितेपणा...
झाडाकडे उडत गेला...

घेऊन आता फांद्या साऱ्या,
वेड्या वाकड्या...
बोडक्या बोडक्या,
झाड घालतंय स्वतःलाच वेटोळा...

रस्ताभर, दूर दूर,
पसरलेला पाचोळा,
स्वतःमध्ये स्वतःलाच,
विसरलेला पाचोळा...