Saturday, May 20, 2017

तेव्हा...

त्या निलायम सांजवेळी सोडूनि गेलीस जेव्हा
आपुला युगांचा संपला संबंध होता
नील नुसते एकटे आकाश अन
सैराट तो वारा किती निर्बंध होता

मोडुनी गेलीस सारे बांध तरीही
राहुनी गेल्याच काही इवल्या कळ्या
तुटला जरी तू माळलेला गजरा तरी
अलवार अजुनि अंतरीचा अनुबंध होता

एकटा पडलो आता मी दूरच्या क्षितिजापरि
उरला तुझा आभास नुसता सांजेवरी
पाऊस आता आठवांचा अंतरी अन
भरला स्मृतींचा आर्त ओला मृदगंध होता

Sunday, January 29, 2017

गीत

आज सारे शब्द माझे, गीत व्हावे...
अंतरीचे भाव अन, संगीत व्हावे

दाटलेली आसवे, रंगीत व्हावी...
अन टिपांतून एक सुंदर, चित्र व्हावे

साठलेले प्रश्न सारे, विरून जावे...
बरसत्या धारांत ते, मृदगंध व्हावे

खोल दडल्या वेदनांचे, सूर व्हावे...
सोबतीला स्पंदनांनी, ताल द्यावे