Saturday, December 17, 2011

अशाच एका संध्याकाळी...

(अशाच एका संध्याकाळी या नाटकामधली कविता...)

... ... ...टेकडीवरच्या घराला भेटायला येणारी, सोनेरी संध्याकाळ...
घरासमोरच्या बागेत, तो एकटाच बसलाय... तिची वाट बघत...
अचानक, आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते;
सोबतीला, पावसाची एखादी हलकीशी सर;
हळुवार, पण अवखळ वारा...
इतक्यात, कुठल्याशा ढगामागून उन्हाची सुंदरशी तिरीप पडते;
अशाच एका संध्याकाळी... ... ...

अशाच एका संध्याकाळी, एकदा तुला भेटायचंय...
हात तुझा हातात घेऊन, काहीतरी सांगायचंय...

माहितीये मला, नेहेमीसारखीच येशील तू ...
कुठलीही न देता चाहूल;
मनात उठेल भावनांचं प्रचंड काहूर...

पण माझ्या रागाचा, चढला असेल पारा;
"हे काय गं तुझं, नेहमीच उशीरा"

ती: "अरे हो हो, चोरून भेटायचं, म्हणजे होतोच थोडा उशीर;
       आणि माहितीये माहितीये, आपण मोठ्ठे वक्तशीर!"

तो: "नाकावरचा राग, पडेल बरं का महाग ;
     आज तुम्हाला हसायला, आम्ही पाडणारच भाग"

ती: "काहीही  करा, आम्ही मुळीच हसणार नाही;
      गालावरची खळी, आज अजिबात दिसणार नाही"

तो: "आमचं सोडा हो, पण या फुलाचं काय?
      तुमच्या सारखं, आज हे ही रुसलंय..."

(ती हसते...)

तो: "आता कसं, सुंदर दिसतयं...
      तुमच्या कडे बघून, गालातल्या गालात हसतंय!"

ती: "तुमच्या समोर, आमचं खरंच काही चालत नाही;
      आमचं मन मुळी, आमच्या जवळ राहातच नाही"

तो: "आमचं तरी मन आमच्याकडे कुठंय?
      अलगदपणे ते या खळीत लपलंय,
      पण आज मात्र आमच्यावर, कुणीतरी रुसलंय"

 ती: "रुसवा, फुगवा चार क्षण, सारं सारं प्रेम फक्त..."
तो: "अबोल, अव्यक्त, निःशब्द, अनासक्त!"

ती: "मनातलं सारं, शब्दांशिवाय कसं कळतं?"
तो: "जसं, डोळ्यांमधून हळुवार नातं जुळतं"

ती: "कोण कुठले दोन जीव, सारं आपलं वाटू लागतं"
तो: "अशाच एका वळणावरती, सगळं आयुष्यच बदलून जातं!"

1 comment:

  1. WOW!!! ...Swanand ...Its awesome....kya language ki strength hain yaar...Marathi la aai sarkha boltana barech da aiklay...pan tich marathi preyasi chya mukhat kiti chaan vatate hyachi janiv hya kavitene karun dili...Mast Kavita....

    ReplyDelete