Monday, April 27, 2009

आशाच एका संध्याकाळी...

अशाच एका संध्याकाळी ... !!!

इकडे ना उंच इमारती नाहीत... इकडून दिसतं तेवढं अथांग आकाश फारसं कधी पाहिलच नव्ह्तं... आअकाशाचे निळे तुकडे दिसायचे मधून मधून... अर्थात... एवढेच लोभस...
पश्चिमेला एक मोकळा माळ आहे... दिड वर्षापुर्वी होता तेवढा मोकळा न ठेवण्याचं ’कर्त्वव्य’ इथल्या माणसांनी केलंय... पण अजूनही, क्षितिजाला टेकणारा तो लाल, तांबूस, सोनेरी सूर्य दिसतो इथून... आत्तापर्यंत क्षितिजाला टेकलेलं सूर्यबिंब फक्त फोटोतच पाहिलेलं... त्याची विशालता, त्याचं ते दिव्यत्त्व... त्या गगनराजाचं राजवैभव ’अनुभवलं’ ते इथंच...
क्षितिजापल्याडच्या त्या दूर जाणाऱ्या वाटेवरची मोहक संध्या... वाऱ्याने विस्कटून टाकलेल्या वाकड्या तिकड्या ढगांवर सोनेरी कवडसे पडले की त्या रंगोत्सवात संध्येचा सुंदर चेहेरा उजळून निघतो... केवढा निष्पाप... केवढा मोहक...!!! आणि मधेच कोठुनसा उडाणारा पक्षांचा एक थवा... जणु दृष्ट लागू नये म्हणून लावलेलं गालबोट...! एखाद्या छानशा चित्रालही लाजवेल असा हा असंख्य रंगांचा सोह्ळा... स्वतःच्या वेगळ्याच रंगात न्हाऊन निघलेला...
पण मग संध्यकाळच का? सकाळी सुद्धा किती छान असतं नाही?... शांत, थंड हवेत, हळूवार वर येणारा सूर्य तेवढाच मनोहर दिसतो की... उलट ही तर सुरुवात...! एका वेगळ्याच, आभासी दुनियेत अलवार घेऊन जाणारी ही प्रभा...
आहो, पण इथं वेळ कोणाला आहे सकाळी सकाळी असले विचार करायला... लेक्चर्स, लॅब, ऑफिस, असाईन्मेण्ट्स, एक्झाम्स... इथे टेन्शन्स काय कमी आहेत... एखादा दिवस ’आजपासून नियमित अभ्यास’ असं ठरवावं आणि केवळ तिसऱ्या स्नूझला उठावं (!) तर... तर आकाश काळ्या ढगांनी भरलेलं... पावसाळा जवळपासही नसताना उगाचच दाटून आलेलं मळभ... उगाचच उदास, भकास वाटणारं... सगळा मूड डाऊन... होतोय आता ’नियमित’ अभ्यास... पाऊस तर नाहीच पडणार बहुतेक... आणि पडलाच तर नेमका लेक्चरला जाताना पडणार... छे... काय भिक्कार हवा पडलिये...
आणि संध्याकाळी सुद्धा कुठलं आलयं ते सोनेरी सूर्यबिंब वगैरे... एकतर ऑफिसमध्ये काम करून दमलेलो, नाहितर लेक्चर्सना झोपून कंटाळलेलो... मस्त चहा प्यायचा आणि रूमवर जाऊन ऑर्कूट... जरा टि.पी. टाईम...
पण मग... मग कधीतरी एखाद्या स्वच्छ सकाळी, का उगाच आपल्याच मनात मळभ दाटून येतं... त्याची ती उदासीनता कुठेतरी खोलवरून आतून येतेय असा काहीतरी मॅड फील येऊ लागतो... आणि एखाद्या वेडया क्षणी... उगाच, क्षणभरच, डोळे भरून आलेत कि काय असं वाटतं... केवढ मॅड..!!! (’वनवास’ मधल्या लंपन सारखं मॅड वाटणं!) आणि का एखाद्या ढगाळलेल्या संध्येला मनात अनेक रंगांचे कवडसे पडतात... सगळं कसं छान, आनंदी... एखाद्या उन्हानी मारून टकणाऱ्या दुपारी, एखादं इवलं फुलपाखरू स्वप्नांच्या वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं... संध्याकाळी कितीही दमलं असलं तरी निवांतपणे झाडाच्या शेंड्यावर पहुडलेलं सोनेरी उन्ह तितक्याच निवांतपणे डोळ्यांत साठवावसं वाटतं... ग्रीष्मातल्या एखाद्या रात्री, फक्त उकडून जीव जातोय म्हणून, टेरेसवर गेल्यावर... जस्ट उगवलेला... पिवळसर, खडबडीत चांदोबा केवढा भावतो...
इतकंच काय... चालू असलेल्या लेक्चरमध्ये किंवा आऊटपूट न येणारा प्रोग्राम डिबग करून फ्रस्ट झालो असताना... उगाचच कुठल्याश्या कोपऱ्यात नजर स्थिरावते... आणि मन... मन त्याच्याच कुठल्याश्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणींच्या किंवा कल्पनांच्या प्रकाशाशी वेगानं स्पर्धा करू लागतं...
भाव दाटू लागतात... कोठून कोण जाणे पण नकळत शब्दही येतात... ’स्फुरणे’ की काय म्हणतात ना तसलं काहीतरी... कधीही... कुठेही...! आणि जितक्या सहज काहीतरी स्फुरतं ना तितक्याच सहज मॅडसारखं ते मनातच विरून जातं... बऱ्याचदा...!!
पण कधीतरी... कधीतरी ती कुठली तरी जाणीव, कसलीशी भावना... सारं मन व्यापून टाकते... आणि ती अथांग खोलीही जेव्हा पूरत नाही तेव्हा सहजपणे कागदावर उतरते... हळूवार, अलगद... तिच्या तिलाच जाणवणाऱ्या असंख्य रंगांबरोबर... आणि मनातच होते एक सुंदरशी संध्याकाळ... कुठेही... कधीही...!!!

आशाच एका संध्याकाळी...

2 comments:

  1. Alas zatakala shevati!!!!!!
    Good, sagalya kavita pan post kar...

    ReplyDelete
  2. एक नंबर मित्रा... please जिवंत ठेव हा ब्लॉग .... धन्यवाद

    ReplyDelete