Thursday, April 30, 2009

मारव्यास...

"मारवा"

मारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग !

...पु.ल.


मारव्यास...

कधी या शब्दांत सख्या, सूर तुझा अवतरेल
सरतील कधी अर्थ सर्व, भाव फक्त दरवळेल

वणवणेन जेव्हा मी, रणरणत्या वाटेवर
हेलाविन एकटाच, एकट्याच लाटेवर
आलापच आर्त कधी, अंतरात ओझरेल ?

सळसळेल वड जेव्हा, एकटाच माळावर
हळहळेल पडलेले, त्याचेच पान जमिनीवर
तगमग ती गमकातील, कधी गळ्यांत गहिवरेल ?

भगभगेल वणव्याचा, जेव्हा अंगार आत
झगमगेल अवसेची, अंधारी किर्र रात
धैवत तो अधीर कधी, काळजात धगधगेल ?

व्यापतील गगनाला, जेव्हा ते जलद गडद
जाणवेल खोल आत, कसलासा क्षीण नाद
कोमल तो ॠषभ कधी, नयनांतून ओघळेल ?

घोंघाविन जेव्हा मी, वाऱ्यागत आक्रंदून
डोकाविन एकट्याच, उंच उभ्या कड्यावरून
गंधित गंधार कधी, गात्रांतून गुणगुणेल ?

पिसाटेन मी जेव्हा, पाहून तो लखलखाट
हिरमुसेन पण आतून, झाली जरी भरभराट
अस्थिर तो षड्ज तुझा, कधी मनात हुरहुरेल ?

तळमळेन जेव्हा मी, बघत वाट एकटाच
अडखळॆन निघताना, कारण... मी एकटाच
तुझा निषाद जणु विषाद, रक्तात कधी विरघळेल ?

शहारेल मन जेव्हा, सत्याने ढळढळीत
थरथरेल कोपऱ्यात, एकटीच सांजवात
मध्यम तो तीव्र तीर, कधी उरात कळवळेल ?

कधी या शब्दांत सख्या...

... स्वानंद

6 comments:

  1. Atishay sundar kavita yaar...

    ReplyDelete
  2. तळमळेन जेव्हा मी, बघत वाट एकटाच
    अडखळॆन निघताना, कारण... मी एकटाच
    तुझा निषाद जणु विषाद, रक्तात कधी विरघळेल ?

    Sundar!!!!!!!

    Jast Gazals wachayala lagalas ki kay :)

    ReplyDelete
  3. khup bhari vatli kavita....kalali nahi mala farshi pan vachayala mast vatli... :)

    ReplyDelete
  4. swandya salya, tula maarva evdha bhari kalla ahe.. bhari lihilays.. dandwat

    ReplyDelete
  5. Swandya jinkalas mitra....marwa khup da ikala pan aaj khara kalala...

    ReplyDelete