Friday, October 3, 2014

खिडकी

हॉटेलच्या खिडकीतून काय सुंदर नजारा दिसतोय !
चहुबाजूला पसरलेली गर्द झाडं, मधोमध एक इवलसं तळं
आकाशात काठोकाठ भरलेले काळे-करडे ढग … 
 सैराभैरा उनाडणाऱ्या वाऱ्याची पावलं,
तळ्याच्या शांत पाण्यावर उमटतायत… 
आकाशातले संध्याकाळचे असंख्य रंग,
पानांनी जमिनीमधून शोषून घेतलेयत… 
कुठे टवटवीत पिवळा, कुठे सचेतन नारिंगी,
कुठे लाघवी लाल तर कुठे नेहेमीचा निरागस हिरवा… 
(आपल्याकडे बोलावताना देवबाप्पा केवढं काही देतो नाही)    
 
या उनाड वाऱ्यात मला गारठून जायचं, 
तळ्याच्या थंड पाण्यात हात बुडवायचाय…
ती केशरी पिवळी पानं हातात घ्यायचीयेत… 
जमिनीवरच्या रंगीबेरंगी पाचोळ्यातून वाट काढायचीये… 
पण… 
पण मध्ये आहे ती हॉटेलच्या रूमची ही खिडकी… 
मला त्या बोचऱ्या थंडीपासून वाचवणारी, 
तो समोरचा सुंदर देखावा चित्रासारखा दाखवणारी,
पण कधीही उघडता न येणारी… 
खिडकी…      

Saturday, September 13, 2014

नभ आणि भुई

नभाच्या किनारी, सप्तरंगी निखारे
नभाच्या मनी, दाटले दुःख सारे

अलवार किरणांतुनी, सांजवेळी 
हळुवार नभ हे, भुईला विचारे 

"अथांग का मी? का एकटा?
का वाटते हे, असे बावरे ?

पडती मला का, असे प्रश्न ज्यांची 
नसती कुणा, माहिती उत्तरे" 

थांबून थोडे, धरा गोड हसते 
म्हणते "नभा, जरा थांब ना रे"

"होईल जेव्हा, किर्र अंधार तेव्हा    
पुसतील दुरुनी तुला, चांदण्या रे 

होईल तेव्हा, जग एकले अन
तुझ्या अंगणी शुभ्र, फुलतील तारे!" 

Saturday, March 29, 2014

का, कोण जाणे ?



काहीही गरज नसताना, अचानक,
काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ
काठोकाठ भरून येतं…
सैरभैर वारा, जिकडे तिकडे धावत सुटतो …
उगाचच चार क्षण, वाऱ्या सोबत,
पाचोळा उंच उडून बघतो…
सळसळणारी असंख्य पानं,
कुठेतरी लपून आतुरतेनी शीळ
घालणारा आर्त कोकीळ,
उगाच हूल द्यायला म्हणून पडलेले
काही टपोरे थेंब…
पण, का कोण जाणे ?
पाऊस काही पडत नाही…
हळुवार ढग पांगतात,
मागून तिरपं उन्ह डोकावंतं,
निळं आभाळ मात्र कसं
दूर दूर दिसू लागतं…

आभाळा, का नाही बरसलास ??
इतकं जवळ येऊनही
इतका का रे दूर गेलास ?
भीती वाटली का रे,
तिच्यासमोर रडायची ?
अरे, त्या ओघवत्या थेंबांमधूनतर
तिला भेटला असतास…
हलक्याशा सरींमधून
हळुवार उलगडला असतास…
तुला असं  वाटलं  का रे,
कि थेट धरतीवर पोहोचतील,
इतके मेघ जमवलेयस तू…

एकेक शब्द जमवता जमवता,
असंच निःशब्द व्हायला होतं गड्या…
का, कोण जाणे ?

Wednesday, September 4, 2013

डोंगर आणि ढग




आकाशातले भले मोठ्ठे ढग,
कधी अचानक खाली येतात… 
उंच एकट्या डोंगराशी,
हळूच गप्पा मारू लागतात… 

उंच उंच डोंगरावरची,
उंच उंच झाडं… 
भल्या थोरल्या ढगांसमोर,
इवली इवली झाडं… 

सळसळणाऱ्या पानांमधून,
झाडं गलका करू लागतात… 
उधाणलेल्या वाऱ्यासंगे,
ढगांकडे हट्ट धरतात… 

फांदीवरचा उनाड कोकीळ,
हिरवं गाणं लिहू लागतो…      
बांबूंमध्ये घुमत वारा,
दडले सूर शोधू पाहतो… 

दूर दरीत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी,
मग डोंगराकडे धावत येतात… 
अन थेंबांचा ठेका धरत,
मोहरणारे सूर जुळतात…!!   

Saturday, June 29, 2013

ओंजळ

एकदा भल्या सकाळी,
अस्फुट स्वप्नील स्वरासारखं,
अनाहूतपणे तू माझ्या समोर यावस…
आणि नुकत्याच खुडलेल्या सुकुमार
फुलांनी भरलेली तुझी ओंजळ,
हलकेच माझ्या हाती रिती करावीस…

तुझ्या या कृतीनी मी पुरता
गोंधळलेलो असताना,
तू अलगद आपला पदर सारखा करावास…  
मी अजून गोंधळाव…
तुला कळू नये म्हणून,
उगाच फुलांकडे पाहावं …

"माझी फुलं"
जितक्या सहज ही फुलं दिलीस,
तितक्याच सहज तू विचारावस…
त्या नाजूक, नितळ फुलांनाही
लाजवेल इतकं निखळ हसावस…
मी स्तंभित होऊन तुझ्याकडे
बघत असता, 
तू हळूच पुन्हा म्हणावंस…
"माझी फुलं !"

ती सुकुमार फुलांनी भरलेली ओंजळ,
मी तुझ्या नाजूक हाती पुन्हा सोपवावी…
अन त्यातली दोन इवली फुलं,
तुझ्या डोळ्यात जाऊन दडावित…

वाऱ्याच्या  हळुवार झुळूकेसारखी
क्षणात अदृश्य झालेली तू…
आणि आपला अदृश्य सुगंध क्षणभरच मागे ठेवणारी…
… "तुझी फुलं !"
   

कविता-बिविता

तुम्ही म्हणे 'प्रतिभावंत',  कविता-बिविता लिहिता
वाचणारी उगाच चार टाळकी, स्वतःला कवी म्हणवता

असाल तुम्ही रिकामटेकडे, म्हणून ओळींवर ओळी खरडता
यमाकांना सोबत घेऊन, प्रतिमांना भरडता

चार ओळी लिहितात हो हे, यांना कुठं काय स्फुरतं ?
संदर्भासहित स्पष्टीकरण, कवितेत दुसरं काय उरतं ?

कविता-बिविता कसल्या करता,
वेळ असेल एवढा तर निबंध लिहा, चार पानी
चार ओळीत कसली करता,
कल्पनांची मनमानी ?

तुम्हाला नसतील हो,
पण आम्हाला व्याप असतात;
तुम्ही आपले फुकाचे, शब्दांचे खेळ करा….
एक फुकटचा सल्ला देतो,
आमच्यासाठी शाळेपासून,
कवितेपेक्षा धडा बरा !

Wednesday, June 26, 2013

कातरवेळ

फिकट झालेत पश्चिमेला, क्षितिजावरचे रंग
क्षितीज झालंय आभाळाच्या, निळाईमध्ये दंग

उरली आहे क्षितिजावरती, अंधुक एक पिवळी रेघ
क्षितिजाच्या पल्याड दूर, बरसणारा कृष्णमेघ

अंधाराच्या शून्यात क्षितीज, कुणाला एवढं शोधतंय ?
आर्त गहिऱ्या निळाईत, वेडं स्वतःच हरवतंय !

क्षितिजाच्या मनात उठलंय, चांदण्यांचं काहूर
अंतरात मंतरलेली… अनाहत हुरहूर

वाऱ्यासारखं सैरावैरा, मनासारखं अधीर झालंय
क्षितीज त्याच्या क्षितीजासाठी, केवढं  सैरभैर झालंय

शांतपणे रात्र दुरून, पाहतीये सारा खेळ
पांघरतीये क्षितिजावरती, गर्द निळी कातरवेळ…