Friday, December 28, 2018

किती?

आत आहे खूप काही साठलेले, 
सरले किती? भरले किती?

शुभ्र आहे खोल काही दाटलेले, 
विरले किती? पांघरले किती?

भावनांचे रंग होते आसवांनी ओढलेले, 
विरघळले किती? पाझरले किती?

अंतरीच्या चेतनांनी दीप होते लावलेले, 
काजळले किती? लखलखले किती?

थोर होते कविते तुझ्याशी बोलणारे,
अवतरले किती? घडले किती?

तू सांग केवळ वाचणारेही आता,
उरले किती? उरले किती? 

Sunday, September 16, 2018

Saturday, May 20, 2017

तेव्हा...

त्या निलायम सांजवेळी सोडूनि गेलीस जेव्हा
आपुला युगांचा संपला संबंध होता
नील नुसते एकटे आकाश अन
सैराट तो वारा किती निर्बंध होता

मोडुनी गेलीस सारे बांध तरीही
राहुनी गेल्याच काही इवल्या कळ्या
तुटला जरी तू माळलेला गजरा तरी
अलवार अजुनि अंतरीचा अनुबंध होता

एकटा पडलो आता मी दूरच्या क्षितिजापरि
उरला तुझा आभास नुसता सांजेवरी
पाऊस आता आठवांचा अंतरी अन
भरला स्मृतींचा आर्त ओला मृदगंध होता

Sunday, January 29, 2017

गीत

आज सारे शब्द माझे, गीत व्हावे...
अंतरीचे भाव अन, संगीत व्हावे

दाटलेली आसवे, रंगीत व्हावी...
अन टिपांतून एक सुंदर, चित्र व्हावे

साठलेले प्रश्न सारे, विरून जावे...
बरसत्या धारांत ते, मृदगंध व्हावे

खोल दडल्या वेदनांचे, सूर व्हावे...
सोबतीला स्पंदनांनी, ताल द्यावे

Monday, October 31, 2016

कवितेस...

का सुकून गेले नयनांमधले पाणी ?
का विरून गेलीस कविते पानोपानी ?
शतरंगांनी नटलेल्या संध्याकाळी,
का पांघरली सावलीच या शब्दांनी ?

कित्येक भेटले शब्द घेऊनि भाव
कधी सूर निरागस, घेऊन आले गाणी!
अज्ञात शांतता मनात घुमली जेव्हा,
तू होतीस कविते, अशी उभी साथीनी!

का गेलीस सोडून आज मला तू कविते,
का दिले सोडूनि, वाऱ्यावर शब्दांनी?
टाकून मला हा असा एकटा येथे,  
हे सूर निघाले, आपल्याच वाटांनी...

का रुसलीस कविते निघून ये तू आता
हि तोड शांतता, गुंजारव गीतांनी
आठव तू आपण आळवलेली गाणी,
ये होऊन कविते, डोळ्यांमधले पाणी!

Sunday, November 8, 2015

आभाळ-निळं तळं

                                                 
     


दूर दूर, सैरभैर पसरलेलं,
नुसतं बर्फ… 
चहुकडे पर्वतरांगा, तिकडेही बर्फ…  
वर पांढऱ्या-करड्या ढगांची अलवार चादर, 
अन खाली… 
खाली… हिम… 
नितळ, निराकार, शुभ्र!

हळुवार ढग पांगतात…
कोवळं उन्ह पडतं,
त्या पिवळ्या प्रकाशात, 
केवढा सुंदर दिसतो तो बर्फ… 

त्या उन्हा पाठोपाठ, 
कोवळ्या किरणांचा हात धरून,
अलगद खाली उतरते, 
आकाशातली निळाई… 

इकडे तिकडे भटकू लागते,
निळं गाणं गाऊ लागते,
स्वतःशीच फेर धरून, 
अलगद नाचू लागते… … 

अन बेभान नाचता नाचता, 
हळुवार विरघळून जाते… 

आत्ता मघाशी इथे होता तो 
निराकार, नितळ, शुभ्र बर्फ… 
पण आता… आता उरलंय… 
एक निरागस, निळं तळं… 
आभाळ-निळं तळं! 

Wednesday, December 3, 2014

नमी

न जाने क्यूँ, कभी अचानक 
आँखोंमें नमीसी आ जाती हैं …  
पास होते हैं लोग फिर भी,  
एक तनहाईसी लगती हैं …   

खो जाता हैं मन 
यादों की गहराइयोंमे,
और चाहता हैं कई चीज़ें,
जो उसे पता होता हैं 
कभी नहीं मिलनेवाली …   

शायद वही चाहते हलकेसे 
आँखोंमैं चली आती हैं …  
उन्हें पता होता हैं जैसे,   
मन से बाहर निकलनेका 
यही एक रास्ता हैं शायद … 
न जाने क्यूँ, कभी अचानक 
आँखोंमें नमीसी आ जाती हैं …