Friday, September 30, 2011

एकदा


आकाशाची अथांग निळाई, 
         एकदा डोळ्यांत शोषून घ्यायाचीये;
अन त्या निळ्या डोळ्यांनी, 
         ढगांची मऊ मऊ स्वप्नं पहायचीयेत...

घोळवायचय गळ्यामध्ये, 
         एकदा झऱ्याचं झुळझुळणं;
अनाम कुणाच्या ओढीनं, 
         एकसंध वाहत राहणं...

समुद्राच्या लाटांचा आवाज, 
         कानांमध्ये भरून घ्यायचाय;
मनाला पूर्ण मोकळं करून, 
         त्याच्यामध्ये साठवायचाय...

मोठ्या, उजाड माळरानावरचा, 
         एकटा पिंपळ व्ह्यायचय एकदा;
व्यापून टाकणाऱ्या शांततेत,
         एकटंच सळसळायचय एकदा...

कुणासाठी तरी एकदा, उंच एखाद्या कड्यावरून,
         धबधब्यासारखं झोकून द्यायचय;
टोकदार, माजुर्ड्या खडकांवर,
         निर्भीडपणे कोसळायचय...

भल्यामोठ्या घराच्या, कुठल्याशा कोपऱ्यामधला,
         कच्च अंधार व्ह्यायचय एकदा;
अन भीती बनून कुणाच्यातरी,
         मनाला वेढून घ्यायचय एकदा...

अवसेच्या अंधाऱ्या रात्रीशी एकदा, 
         चांदण्या होऊन बोलायचय;
आपल्या फक्त अस्तित्वानं, 
         तिला मोहरून टाकायचंय...

कुठल्याशा वेड्या कवीची, 
         अनाम कविता व्ह्यायचय एकदा;
अन वाचणाऱ्या प्रत्येकाला, 
         हळुवार कवेत घ्यायचय एकदा...  Wednesday, September 28, 2011

स्वान्ड्यारावांची PhD

(माझ्या पासपोर्ट मिळवण्याच्या अन नंतरच्या PhD application च्या काळात मी सर्वात जास्त जर कुठल्या मित्राकडे रडलो असेन, तर तो अभ्या (अभिषेक) काकडे (उर्फ चोच्या). पठ्ठ्यानी तेव्हा माझं सगळं ऐकून घेऊन, मित्रधर्म पाळला. पण नंतर मात्र त्यानी, या सगळ्या 'प्रकरणा'वरून माझी खेचायचा एकही chance सोडलेला नाही. (थोडक्यात, अजूनही तो मित्रधर्म पाळतोय :) )
तर, या सगळ्या 'भानगडी'वर काहीतरी लिही, असं त्यानी मला हज्जारदा सांगूनही मी अजून तरी काही लिहिलेलं नाहीये. कारण काहीही असो - काही विशेष अंगभूत 'गुणांचा' (जसे, आळस) प्रभाव म्हणा किंवा स्वतःच्या गंडण्याकडे तिऱ्हाईतपणे पाहण्यासाठी लागणाऱ्या मोठेपणाचा अभाव म्हणा. पण आमचे अभ्याराव बाकी जिद्दी आणि हुशार. जिद्दी यासाठी की आमच्या 'कर्तृत्वावर' काहीतरी लिहिलं जावं यासाठीचे प्रयत्न त्यानी सोडले नाहीत. आणि हुशार यासाठी की स्वतः लिहिण्याच्या फंदात काही तो पडला नाही. पण त्यानी माझे सगळे पराक्रम त्याच्या मैत्रिणीला - त्रिपुराला - सांगितले, आणि तिनी चक्क त्यावर एक झक्कास कविता लिहिली! आता अभ्याला Thank you म्हणायला, माझी शौर्यगाथा कथन करण्यामागचे त्याचे विचार फार स्वच्छ होते असं काही मला वाटत नाही :) पण केवळ त्यानी केलेल्या वर्णनावरून - जे किती भयानक असेल हे मी imagine करू शकतो - इतकी सुंदर कविता केल्याबद्दल त्रिपुराला खूप खूप धन्यवाद...!!! )

स्वान्ड्यारावांची PhD

M. Tech. ची धांदल संपता संपताच,
पुढच्या degreeची लागली हाव...
परदेशी जाऊनच करीन PhD,
ठरवून बसले आमचे स्वान्ड्याराव !

केला अर्ज मग पासपोर्टसाठी,
पाहिला टाकून पहिला डाव...
५०,००० तही मिळेना पासपोर्ट तरीही,
भरत राहिले ब्यागा स्वान्ड्याराव !

चालवली घरे वकिल, जज्जांची,
वेळोवेळी घेतली कोर्टात धाव...
थोपटून आपले दंड पोलादी,
PhD साठी राहिले लढतच स्वान्ड्याराव !

ऐटीत दिली पार्टी सांगत,
पुढल्यावेळी असेल नवा गाव...
या वेळीही म्हणू सगळे तसंच,
पार्टी मात्र द्या ... स्वान्ड्याराव !

आभ्या, विशल्या पोचले U.K. त,
बारक्याला मिळाला गडचिरोलीत भाव...
G.R.E. मध्ये काढूनही स्कोर मजबूत,
राहिले बघत वाट स्वान्ड्याराव !

कुठूनही यावा एकदाचा call,
university चे नसेना ऐकीवात नाव...
प्रार्थना शनीला आम्हा पामरांची,
PhD ला जावे आमचे स्वान्ड्याराव !

- त्रिपुरा

Monday, September 5, 2011

गूढ

लपले आहे,
मनात काही खोल, गुढसे;
विचार कोणता डोकाविल,
त्याचे टाकित फासे...

विचार-वादळ भयाण जेव्हा,
मनात उठते;
केंद्र तयाचे तिथेच कोठे,
दडले असते.

अनाम कुणास्तव,
मनास जेव्हा हुरहूर वाटे;
मृदगंधापरी सुगंध सुंदर,
तिथेच दाटे.

भडकुनी वणवा रागाचा,
मन लाही जेव्हा होते;
पेटविणारी ठिणगी पहिली,
तिथेच पडली असते.

हात कुणाचा आहे हाती,
भासे जेव्हा;
उमले सुंदर कळी चिमुकली,
तिथेच तेव्हा.

मनास पुसले,
"सांग मना,
हे गूढ कोणते?"

वदले मन, "हे,
गूढ निरंतन,
तुझ्याप्रमाणे,
स्वतः स्वतःचा,
शोध घेते ! "

Thursday, September 1, 2011