Thursday, March 17, 2011

छोट्याशा नातवाची छोटीशी कविता

रोज, भल्या पहाटे
आजोबा 'आपोआप' उठतात
अन पूजेसाठी बागेतली
फुलं खुडू लागतात

"काय स्वान्दोबा, फिरायला येणार का?"
एकच हाक मारतात
आणि कधीही न उघडणारे माझे डोळे
आज मात्र, तसेच, आपोआप उघडतात

दोन दोन स्वेटर घालून
मग आम्ही फिरायला निघतो
गच्च धुक्यातला एकटा रस्ता
कसला सॉलिड दिसतो

"हे झाड अमुक-अमुक, तो पक्षी तमुक-तमुक"
आजोबा काय काय सांगतात
"मज्जाय की नाही!" म्हणत
कसले गोड हसतात

घरी आल्यावर आज्जी
मस्त गरम उपीट करते
आई हिची मुलागीये ना
मग हिची चव इतकी भारी कशी असते?

दुपारी जेवणात तर
माझी फुल्ल मज्जा असते
आज्जी मला मऊ मऊ
आमटी-भात कालवून देते

आजोबा त्यांच्या ताटातला
दहीभात देतात
"कसाय?" म्हणत
भूर्र्र भुरका मारतात

दुपारी मी स्वयंपाक घरात
भांडी पाडत, खेळत असतो
"लागेल रे, हळू" एवढाच
आजीचा ओरडा असतो

पण त्या आवाजानी
आजोबा मात्र उठतात
"क्रिकेट खेळायचं का?"
स्वतःच मला विचारतात

आमचे आजोबा तर तेंडल्यापेक्षा
भारी क्रिकेट खेळतात
मी कधीही म्हणलं की
लगेच मला batting देतात

संध्याकाळी मग आम्ही तिघं
फिरायला जातो
म्हणजे ते दोघं फिरतात,
मी नुसता हुंदडतो

"इकडे बघ गाडी आहे, तिकडे खड्डा आहे"
आई बाबा नुसते सूचना देत असतात
आणि वर सगळा रस्ताभर
माझा हात पकडतात

इकडे मात्र मी
आजीचा हात पकडतो
"नातू असला की काळजी नसते"
आजीचा नेहेमीचा डायलॉग असतो

"हा आमचा नातू बरं का!"
सगळ्यांना सांगत सुटतात
आणि नेहेमीपेक्षा बहुतेक
जरा जास्तच हसत असतात

रात्री मग दमल्यावर,
छान छान जेवल्यावर,
आजोबा लगेच घोरू लागतात
आज्जी मात्र काहीतरी
सांगत राहते
"आता तू मोठ्ठा झालायस,
हे करत जा, ते नको"
एकटीच बोलू लागते

मग मधेच थांबून विचारते
"मोठेपणी तू कोण होणार?"
तेंडल्या, पायलट, सैनिक, शास्त्रज्ञ...
"आज्जी, मी... मी आजोबा होणार!"

आधी आज्जी खूप हसते
नंतर हळूच म्हणते
"त्याला खूप सोसावं लागतं राजा!"

मला काहीच कळत नाही
नुसती झोप येत असते
आज्जी मात्र मला
नुसतीच थापटत राहते

१३ मार्च २०११
(आजोबांच्या ८१ व्या वाढदिवशी, मामाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी केलेली कविता)

10 comments: