Saturday, November 12, 2011

समुद्र


(मोहितच्या अजून एका सुंदर कवितेचं अभिवाचन करायचा प्रयत्न केलाय, आणि त्याचा विडीयो पोस्ट केलाय. सोबत कविता सुद्द्धा पोस्ट करतोय.)

आज समुद्र येईल स्वप्नात तुझ्या
अलगद पाउस झेलत असणारा
त्याच्या लाटांवर तुझी स्मिते
... सहज हेलकावत असणारा....

म्हणशील तू हा इतका खारट
तरी हसतो इतका गोड कसा ?
उत्तरातही स्मित देऊनी
नुसता गप्प गप्प बसणारा...

मग, सहजपणे तू त्याच्याशी
गप्पा मारू लागशील...
तेव्हा, लाटांइतक्याच हळुवारपणे,
सारं तुझं ऐकून घेणारा...

असंख्य विचारांनी भरलेलं तुझं मन,
त्याच्यासारखंच... अथांग !
अन, बोलता बोलता भरून आलेले तुझे डोळे,
लाटांवरून दूर दूर, क्षितिजापर्यंत नेणारा...

मग तू होशील गप्प गप्प,
डोळे मात्र बोलू लागतील...
तेव्हा, ओघळणारा तुझा प्रत्येक अश्रू,
अलगदपणे टिपणारा...

शेवटी सारं बोलून झाल्यावर,
हलकं हलकं वाटल्यावर,
...पुन्हा म्हणशील तू हा इतका खारट
तरी हसतो इतका गोड कसा ?
उत्तरातही स्मित देऊनी
नुसता गप्प गप्प बसणारा...

डोळे कोरडे झाल्यावर,
मिस्कील हसशील स्वतःवर
हीच भावनांची भारती ओहोटी
शिंपल्या शिंपल्यात जपणारा....

एकटक त्याच्याकडे बघून
थोड गंभीर मनात म्हणशील
आपलेच अश्रू टिपून टिपून
हा इतका खारट होणारा? ...

तरी शांत शांत भासणारा....

मग म्हणणार नाहीस तू..
हा इतका खारट, तरी हसतो इतका गोड कसा ?
तरी नेहमीसारख स्मित देऊन
नुसत गप्प गप्प बसणारा...

आज समुद्र येईल स्वप्नात तुझ्या...

                             -- मोहित




Sunday, November 6, 2011

स्वानंद

(मला आत्तापर्यंत मिळालेली सर्वांत सुंदर भेट !  इन्जिनिअरिन्गच्या शेवटी माझ्या मित्रानी, मोहितनी, दिलेली.  मला मान्य आहे कि, तुला  Thank you म्हटलं पाहिजे.  पण खरं सांगू का, ही भेट त्याच्या फार पलीकडची आहे मोहित !!!)



तुम्ही  पाहिलं  असेल  कुणाला  दारू  चढताना,
कुणाला  भांग  चढताना,
अहो  कुणाला  सिगरेटही  चढताना  . . .
पण  आमच्या  स्वानंदला  ना  'संध्याकाळ'  चढते !
चढता  चढता  संध्याकाळ   एक  सुंदर  रात्र  होते
काठोकाठ  भरलेलं  मद्याचं  पात्रं  होते  . . .

पात्र  म्हणजे ?
अहो,  पात्र  म्हणजे  काचेचा  सुंदर  निमुळता  ग्लास
मग  स्वान्ड्या  ती  संध्याकाळ  हळूहळू  पितो
                               अन  वागतो  एकदम  झक्कास

सकाळी  स्वानंद  एकदम  सिरीयस,  शांत,  सालस
                                                  लेखक  वाटतो
पण  संध्याकाळी  अवखळपणा  त्याच्या  अंगाखांद्यावर
                                                            नाचतो

मग  स्वान्ड्या  उडतो  काय ?  हसतो  काय ?
        रडतो  काय ?  खेचतो  काय ?
म्युझिक  मिळालं  की हलवतो  आपले  बारीक  बारीक
                       हात  पाय  . . .


आता  तर  एकच  घोट  पिऊन  झालेली  असते  'संध्याकाळ'
मग  स्वान्ड्या  मस्तपैकी  pillar ला  रेलून  उभा  राहतो 
अन  ऐटीत  आणखी  एक  घोट  घेतो 
मग  ग्लास  असा  प्रकाशात  उंचावत ,
किती  उरलीये  संध्याकाळ  ते  बघून  घेतो  . . .

अजून  संध्याकाळ  बरीच  उरली  असते
पण  तिला  रात्रीची  कविता  स्फुरली  असते
मग  तिलाही  प्रश्न  पडतो,  कवि  कोण ?
स्वानंद  की  . . .   . . .
असो  . . .

दारूत  सोडा  टाकावा  ना  तशी  हळूच  रात्र  त्या
                                               ग्लासात  पडते
पण  कसय,  सोड्यानी  जरा  नशा  कमी  होते
पण...  रात्र  पडली  ना,  कि जरा  लवकर  चढते

मग  स्वानंद  गाणी  गातो  . . .  विचित्र  गाणी  . . .
स्वानंदी  स्वानंद  कढे  . . .  वगैरे  . . .  वगैरे  . . .

लोकांना  नाही  झेपत,  पण  तो  संध्याकाळ  पिऊन
स्वानंद  घेत  असतो  . . .   . . .

असाच  स्वानंद  चालत  रहातो  रात्रभर  . . . 
संध्याकाळच्या  सोबतीला  . . . 
अन  मग  संपते  संध्याकाळ  . . .  पण

स्वानंद  ठेऊन  देतो  दोन  थेंब  त्या  ग्लासात
फक्त  उद्याच्या  आठवणीसाठी  . . .  . . . 

                                  --  मोहित