Friday, October 5, 2012

पसारा

शोधतोय एवढं मी, सारखं सारखं ...
पण ही  कविता मात्र, काही केल्या सापडत नाहीये अजिबात ...
मनामध्ये नुसता विचारांचा पसारा झालाय ... ...
नुसता पसारा...

तशा एरवी, पसाऱ्यात मला वस्तू सापडतात पट्कन ...
पण गेले काही दिवस, काहीतरी जाम बिनसलंय ...
ते कसंय ना,
जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अगदी,
अगदी मनापासून हवी असते ...
तेव्हा त्या गोष्टीला ते कळतं बहुतेक, अपोआप !
मग ती नेमकी काही केल्या सापडत नाही
कितीही शोधा, नुसता पसारा होतो मग ...
नुसता पसारा ...

घरी होतो तेव्हा एक बरं होतं  ...
अशा वेळी मी उगाच जुन्या वह्या उचकायचो
कुठल्यातरी वहीच्या शेवटच्या पानावर
उगाच कुठलीशी अनामिक कविता लिहिलेली सापडायची
(शाळा कॉलेजात तासांना फारस लक्ष द्यायचो नाही,
हे किती बरं होतं !)
मग शेवटच्या पानावर, काही ओळी खरडलेली
ती अभ्यासाची वही,
मला उगाच माझी कवितांची वही असल्यागत वाटायचं
मी अजून एखादी तशी वही शोधू लागायचो
माझ्या कवितांच्या अनेक वह्या असल्यासारखं ... उगाच ...
"अरे का पसारा करतोयस स्वान्द्या ?"
मग आई विचारणार ...
छे! मनात नुसता विचारांचा पसारा झालाय ...
नुसता पसारा ...

करायच्या उरलेल्या assignments , तपासायचे राहिलेले reports ,
पुढच्या आठवड्यातल्या परीक्षा ...
हे अशा वेळी असलं काहीतरी टपकंत मनात
Facebook उघडून बसलं, की का नाही रे टपकंत तुम्ही ?
च ... मी पसाऱ्याचा अजून पसारा घालतोय ...

मग ... मग आठवणी शोधू का ?
आठवणींच्या फार सुंदर कविता बनतात ...
नाही ... नाही नको !
मग मीच हरवून जाईन त्यांच्यात पूर्णपणे  ...
काहीशे मैल दूर असणं वेगळं
आणि सात समुद्र दूर असणं फार वेगळं ...
उगाच मग पापण्या ते समुद्र ओलांडू पाहतात ...
आणि मग समोरचं सारं गढूळतं ... ... ...
नको ! आठवणी नकोच !

अरे, नको म्हटलं न तुम्हाला,
मग तरी उगाच का गढूळल्यागत वाटू लागलाय ...
आत्ता ... हो, नेमकी आत्ता, ही कविता सापडायला हवी,
आणि म्हणूनच मग ती सापडत नाहीये कदाचित ... 
दिसतोय  तो नुसता पसारा ...

या अशा, आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींनी,
response द्यायला हवा आपण हाक मारल्यावर ...!
पण मग कविता 'ओ' देईल,
अशी खोल हाळी द्यायला हवी ...
आणि आतून हाक मारायला,
मन रितं असायला हवं ...
म्हणजे मग हळुवार ते कवितेनी भरून जाईल ...!
किंवा मग ते आधीच भावनांनी काठोकाठ भरलेलं हवं ...
म्हणजे मग अलगद कविता वर तरंगत येईल ...!
पण .... पण मनात साला नुसता विचारांचा पसारा झालाय ...
नुसता पसारा ... ... ...