Monday, October 31, 2016

कवितेस...

का सुकून गेले नयनांमधले पाणी ?
का विरून गेलीस कविते पानोपानी ?
शतरंगांनी नटलेल्या संध्याकाळी,
का पांघरली सावलीच या शब्दांनी ?

कित्येक भेटले शब्द घेऊनि भाव
कधी सूर निरागस, घेऊन आले गाणी!
अज्ञात शांतता मनात घुमली जेव्हा,
तू होतीस कविते, अशी उभी साथीनी!

का गेलीस सोडून आज मला तू कविते,
का दिले सोडूनि, वाऱ्यावर शब्दांनी?
टाकून मला हा असा एकटा येथे,  
हे सूर निघाले, आपल्याच वाटांनी...

का रुसलीस कविते निघून ये तू आता
हि तोड शांतता, गुंजारव गीतांनी
आठव तू आपण आळवलेली गाणी,
ये होऊन कविते, डोळ्यांमधले पाणी!