Sunday, December 18, 2011

कविता, नाटक आणि मी...

"अरे काये हे स्वान्ड्या? समुद्र काय, तळं काय, दगड काय?  आणि तुझ्या कवितेचं नाव काय तर 'हो! पण...' आणि पुढे कंसात समुद्र...! आता याचा कसा संबंध लावायचा त्या कवितेतल्या दगडाशी?" फोनवर मित्र बोलत होता... काये ना... आमच्या group मध्ये सहसा कुणीच सरळ बोलत नाही... irrespective of ती व्यक्ती पुण्याची आहे किंवा नाही... पण इथे मात्र त्याचं बरोबर होतं... ही कविता ज्या नाटकामधली आहे त्याबद्दल त्याला काहीच माहित नव्हतं... मग त्याला मी ही कविता 'हो! पण...' नावाच्या एका नाटकासाठी लिहिल्याचं सांगितलं... आणि थोडक्यात नाटकाची कथा सुद्धा सांगितली... "अरे, मग ही background type करायचे कष्ट घे की जरा आळशी माणसा.." तिकडून reply आला...  


फोन ठेवला खरा पण मनातनं विचार जाईचनात... 
"हो! पण..." ... माझं कॉलेज मधलं शेवटचं नाटक...! नाटकामाधला protagonist 'रवी', सध्या एका software कंपनी मध्ये काम करतोय... कॉलेज संपवून त्याला दोन वर्ष झालीयेत... कॉलेजच्या नाटकातून भरपूर कामं केलेला... आणि, कॉलेज मध्ये असताना नाटकाचा किडा अंगात भिनलेला... त्याचा कॉलेज मधला मित्र आणि त्याच्या नाटकांचा दिग्दर्शक 'आदित्य' मात्र नोकरी न करता नाटकच करतोय...
आत्ता रवीला कंपनी मध्ये on-site चा call आलाय, UKला जायचा... आणि नेमकं त्याच वेळी आदित्य त्याला त्याच्या एका प्रायोगिक नाटकामध्ये काम करायला बोलावतोय... भूमिका खरंच खूप सुंदर आहे... पण मग on-site चा call ...?
तेव्हा रवीच्या मनात निर्माण झालेल्या द्विधा मनस्थिती वरचं हे नाटक... स्वतःच्या मनापासून दूर जाऊन practically वागू पाहणारा रवी आणि  त्यापासून ओढून त्याला पुन्हा स्वतःपाशी आणणारी त्याच्या मनातली संवेदना यांच्या मधला संवाद म्हणजे हे नाटक... हो! पण...   

आज बरोबर चार वर्षांनी इतकी नाटकासारखी परिस्थिती निर्माण होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.... IIT मध्ये नाटकं करायचा मस्त चान्स मिळाला... पण नोकरीला लागल्यावर मात्र सगळं बंद पडलं... आज बरोब्बर दोन वर्षांनी परत नाटक करायचा चान्स मिळतोय... तेही बंगलोरसारख्या शहरात...
हो! पण...
पण नेमकं याच वेळी मला US  मध्ये PhD साठी applications करायची आहेत...

अनुभवामधून कल्पना सुचतात असं म्हणतात... इथे आधी सुचलेल्या कल्पनेचा तंतोतंत अनुभव येतोय...!

अशा मनस्थित आज हे नाटकं पुन्हा एकदा पाहिलं... आणि आज ते जरा जास्तच भावलं...! असो. त्यातला कवितेला context असणारा हा भाग  -- --

(तो: रवी,   ती: त्याची संवेदना)

ती: पण, जर पटत असेल तुला तर जा ना on-site ला... काय होईल ?
तो: अडकत जाईन मी त्याच्यात... मग पुन्हा प्रचंड काम...
ती: पण त्यातनही काहीतरी मिळेल तुला... status raise करणारं... रुढार्थान यशाकडे नेणारं... आणि  ते तुला हवंय...
तो: हो! पण...
ती: काय ?
तो: नाटक...!
ती: मग imagine कर की तू नाटक करतोयस... मोकळं सोड मनाला... तू whole heartedly फक्त नाटक करतोयस... मग...
तो: मग... मग सगळं रुटीनच एकदम बदलून जाईल ना... पुन्हा त्या मिटींग्स, त्या चर्चा, ते lively routine ...

(तो खरच असं घडतंय असं imagine करू लागतो... नाटकाच्या मिटिंग मध्ये तो आणि आदित्य बोलतायत...)

आदित्य:  नाही रे रव्या... म्हणजे, तू करतोयस चांगलं... पण मला वाटतं तुला अजून तुझं character च नीट समजलं नाहीये...
तो: ए आद्या... हे तुझं नेहेमीचंचे बरं का... आणि मग तू म्हणशील...
दोघं मिळून: जरा 'between  the  lines' विचार कर ना... (दोघं हसतात...)
तो: आणि मग मला त्या lines  मध्ये सोडून तू मोकळा...!
आदित्य: अरे पण जमलंय तुला ते आत्ता पर्यंत... हे बघ तुझं जे character आहे ना...

ती: मग तुमची प्रश्नोत्तरं सुरु होतील... आणि त्यात तू हरवत जाशील...
तो: मग... मग मला माझं expression सापडेल...! गेल्या दोन वर्षांपासून हरवलेलं... वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात स्वतःला व्यक्त करण्याचं...
आदित्य: जमलंय तुला... proper  घेतलंस...!
ती: आणि नाटक छान होईल... तू मनापासनं आणि involve होऊन acting करतोस याला दुजोरा मिळेल...
तो: पण फक्त मित्रांकडून... बाकीच्या लोकांसाठी मी फक्त एक हौशी कलाकार असेन... software engineer नाही...
(आदित्य निघून जातो)

ती:  But when you need something badly the whole universe conspires to help you achieve that ...! Alchemist वाचलं आहेस ना...
तो: हं... किंवा ती गोष्टच तुमच्यासाठी universe होऊन जाते...!
पण bank balance मध्ये dollars नाही जमा होत.. आणि मग मनातून कितीही वाटत असलं ना तरी कुणीतरी म्हणतं 'विचार कर'
मला कळत नाही शाळेत असताना का घेतलं मला बाईंनी नाटकात...? का तेव्हापासून केलेल्या सगळ्या भूमिका मला आवडल्या...?? या जगातले ९९% लोक या रोजच्या रुटीन मध्ये, मिळणाऱ्या promotions मध्ये आहेत ना सुखी... मग मलाच का असं स्वतःला अभिव्यक्त करायला आवडतं...???

(आणि मग येते ही कविता... हो! पण... (समुद्र))                                                        
रणरणत्या उन्हात, एका दुपारी,
एका शांत तळ्याकाठी बसलोय...
त्याचं निळाशार पाणी, का कोण जाणे,
मला समुद्राची आठवण करून देतंय...
अथांग समुद्राची...
माझी नजर क्षितिजापर्यंत नेणारा समुद्र...
...
मी ऊभाही होतो त्याच्या लाटेत,
जेव्हा माझ्या पायाखालची थोडीशी वाळू घेऊन घेली ती लाट...
मला स्वतः मध्ये, आत ओढून घेऊन गेली ती लाट...
कदाचित, पुढच्याच लाटेबरोबर पुन्हा किनाऱ्यावर सोडण्यासाठी...
...
तळ्याचं पाणी मात्र निश्चल आहे...
ना समुद्राचा गाज, ना निर्झराची झुळझुळ...
पण त्यामुळे माझंच प्रतिबिंब, मला पुन्हा पुन्हा दाखवणारं...
आणि मला हवंय ते, स्वतःच स्वतःला असं निरखून बघणं...
पण मग का कोण जाणे...
मी दगड टाकतो पाण्यात, आणि तरंग उठतात...
पुन्हा एकदा समुद्राची आठवण करून देणारे...
माझी नजर क्षितिजापर्यंत घेऊन जाणारा समुद्र...


तो:  अद्याचा message आला होता... बक्षीस मिळालं आणि लोकांना आवडलं तर नाटक professionally  करूया म्हणतोय...
ती: सही...!
तो: सही काय... मी त्या UK च्या call ला अजून reply नाही केलेला... उद्या शेवटचा दिवस आहे...
ती: पण मग तू UK ला न जाता... ...
तो: म्हणजे...?
ती: म्हणजे बाकी job व्यवस्थित कर ना...
तो: पण मग मी हा call deny  केला तर माझं reputation, माझी image सगळंच खराब होईल... आणि माझा  colleague  आत्ता पासूनच एवढं काम करतोय की मी एक दोन वर्ष नाटकं केली तर माझा PL म्हणून तोच येईल...
ती: चांगलंय ना मग... wavelength जुळेल तुमची...!
तो: काहीही काय बोलतेयस... आणि आत्ता मी नाटक केलं आणि पुढे ते professional level ला गेलं तर...
ती: मग professional shows नको करूस...
तो: काय ?
ती: अरे असंच करत राहिलास तर नाटक कधीच करता नाही येणार तुला...
तो: मला वाटतंय मी स्वतःच स्वतःच्या हातातून निसटतोय... आत्ता जर UKचा चान्स गेला तर मग मिळणं अवघडे...


ती: तुला ना... तुला तळ्यातच समुद्राच्या लाटा हव्यायेत... क्षितिजापासून येणाऱ्या... आणि त्या फेसाळत्या समुद्रामध्ये तुला तुझं प्रतिबिंब बघायचं... 
तो: हो... मला दोन्ही गोष्टी हव्यात... तेवढ्याच intensityनी...
ती: पण प्रवाहात आणि प्रवाहाविरुद्ध एकाच वेळी कसं ना पोहोता येईल...?
तो: हो! पण...
ती: विचार कर... तळं तुझ्यापाशीच आहे... आणि वाटलंच कधी जर तुला लाटांमध्ये जावसं... तर त्या तळ्यातच पाय सोड ना... आणि शांतपणे विचार कर... ते तळच तुला अथांग समुद्रासारखं वाटेल...!!!

Saturday, December 17, 2011

हो! पण... (समुद्र)

रणरणत्या उन्हात, एका दुपारी,
एका शांत तळ्याकाठी बसलोय...
त्याचं निळाशार पाणी, का कोण जाणे,
मला समुद्राची आठवण करून देतंय...
अथांग समुद्राची...
माझी नजर क्षितिजापर्यंत नेणारा समुद्र...


...


मी ऊभाही होतो त्याच्या लाटेत,
जेव्हा माझ्या पायाखालची थोडीशी वाळू घेऊन घेली ती लाट...
मला स्वतः मध्ये, आत ओढून घेऊन गेली ती लाट...
कदाचित, पुढच्याच लाटेबरोबर पुन्हा किनाऱ्यावर सोडण्यासाठी...


...


तळ्याचं पाणी मात्र निश्चल आहे...
ना समुद्राचा गाज, ना निर्झराची झुळझुळ...
पण त्यामुळे माझंच प्रतिबिंब, मला पुन्हा पुन्हा दाखवणारं...
आणि मला हवंय ते, स्वतःच स्वतःला असं निरखून बघणं...
पण मग का कोण जाणे...
मी दगड टाकतो पाण्यात, आणि तरंग उठतात...
पुन्हा एकदा समुद्राची आठवण करून देणारे...
माझी नजर क्षितिजापर्यंत घेऊन जाणारा समुद्र...


अशाच एका संध्याकाळी...

(अशाच एका संध्याकाळी या नाटकामधली कविता...)

... ... ...टेकडीवरच्या घराला भेटायला येणारी, सोनेरी संध्याकाळ...
घरासमोरच्या बागेत, तो एकटाच बसलाय... तिची वाट बघत...
अचानक, आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते;
सोबतीला, पावसाची एखादी हलकीशी सर;
हळुवार, पण अवखळ वारा...
इतक्यात, कुठल्याशा ढगामागून उन्हाची सुंदरशी तिरीप पडते;
अशाच एका संध्याकाळी... ... ...

अशाच एका संध्याकाळी, एकदा तुला भेटायचंय...
हात तुझा हातात घेऊन, काहीतरी सांगायचंय...

माहितीये मला, नेहेमीसारखीच येशील तू ...
कुठलीही न देता चाहूल;
मनात उठेल भावनांचं प्रचंड काहूर...

पण माझ्या रागाचा, चढला असेल पारा;
"हे काय गं तुझं, नेहमीच उशीरा"

ती: "अरे हो हो, चोरून भेटायचं, म्हणजे होतोच थोडा उशीर;
       आणि माहितीये माहितीये, आपण मोठ्ठे वक्तशीर!"

तो: "नाकावरचा राग, पडेल बरं का महाग ;
     आज तुम्हाला हसायला, आम्ही पाडणारच भाग"

ती: "काहीही  करा, आम्ही मुळीच हसणार नाही;
      गालावरची खळी, आज अजिबात दिसणार नाही"

तो: "आमचं सोडा हो, पण या फुलाचं काय?
      तुमच्या सारखं, आज हे ही रुसलंय..."

(ती हसते...)

तो: "आता कसं, सुंदर दिसतयं...
      तुमच्या कडे बघून, गालातल्या गालात हसतंय!"

ती: "तुमच्या समोर, आमचं खरंच काही चालत नाही;
      आमचं मन मुळी, आमच्या जवळ राहातच नाही"

तो: "आमचं तरी मन आमच्याकडे कुठंय?
      अलगदपणे ते या खळीत लपलंय,
      पण आज मात्र आमच्यावर, कुणीतरी रुसलंय"

 ती: "रुसवा, फुगवा चार क्षण, सारं सारं प्रेम फक्त..."
तो: "अबोल, अव्यक्त, निःशब्द, अनासक्त!"

ती: "मनातलं सारं, शब्दांशिवाय कसं कळतं?"
तो: "जसं, डोळ्यांमधून हळुवार नातं जुळतं"

ती: "कोण कुठले दोन जीव, सारं आपलं वाटू लागतं"
तो: "अशाच एका वळणावरती, सगळं आयुष्यच बदलून जातं!"

Saturday, November 12, 2011

समुद्र


(मोहितच्या अजून एका सुंदर कवितेचं अभिवाचन करायचा प्रयत्न केलाय, आणि त्याचा विडीयो पोस्ट केलाय. सोबत कविता सुद्द्धा पोस्ट करतोय.)

आज समुद्र येईल स्वप्नात तुझ्या
अलगद पाउस झेलत असणारा
त्याच्या लाटांवर तुझी स्मिते
... सहज हेलकावत असणारा....

म्हणशील तू हा इतका खारट
तरी हसतो इतका गोड कसा ?
उत्तरातही स्मित देऊनी
नुसता गप्प गप्प बसणारा...

मग, सहजपणे तू त्याच्याशी
गप्पा मारू लागशील...
तेव्हा, लाटांइतक्याच हळुवारपणे,
सारं तुझं ऐकून घेणारा...

असंख्य विचारांनी भरलेलं तुझं मन,
त्याच्यासारखंच... अथांग !
अन, बोलता बोलता भरून आलेले तुझे डोळे,
लाटांवरून दूर दूर, क्षितिजापर्यंत नेणारा...

मग तू होशील गप्प गप्प,
डोळे मात्र बोलू लागतील...
तेव्हा, ओघळणारा तुझा प्रत्येक अश्रू,
अलगदपणे टिपणारा...

शेवटी सारं बोलून झाल्यावर,
हलकं हलकं वाटल्यावर,
...पुन्हा म्हणशील तू हा इतका खारट
तरी हसतो इतका गोड कसा ?
उत्तरातही स्मित देऊनी
नुसता गप्प गप्प बसणारा...

डोळे कोरडे झाल्यावर,
मिस्कील हसशील स्वतःवर
हीच भावनांची भारती ओहोटी
शिंपल्या शिंपल्यात जपणारा....

एकटक त्याच्याकडे बघून
थोड गंभीर मनात म्हणशील
आपलेच अश्रू टिपून टिपून
हा इतका खारट होणारा? ...

तरी शांत शांत भासणारा....

मग म्हणणार नाहीस तू..
हा इतका खारट, तरी हसतो इतका गोड कसा ?
तरी नेहमीसारख स्मित देऊन
नुसत गप्प गप्प बसणारा...

आज समुद्र येईल स्वप्नात तुझ्या...

                             -- मोहित
Sunday, November 6, 2011

स्वानंद

(मला आत्तापर्यंत मिळालेली सर्वांत सुंदर भेट !  इन्जिनिअरिन्गच्या शेवटी माझ्या मित्रानी, मोहितनी, दिलेली.  मला मान्य आहे कि, तुला  Thank you म्हटलं पाहिजे.  पण खरं सांगू का, ही भेट त्याच्या फार पलीकडची आहे मोहित !!!)तुम्ही  पाहिलं  असेल  कुणाला  दारू  चढताना,
कुणाला  भांग  चढताना,
अहो  कुणाला  सिगरेटही  चढताना  . . .
पण  आमच्या  स्वानंदला  ना  'संध्याकाळ'  चढते !
चढता  चढता  संध्याकाळ   एक  सुंदर  रात्र  होते
काठोकाठ  भरलेलं  मद्याचं  पात्रं  होते  . . .

पात्र  म्हणजे ?
अहो,  पात्र  म्हणजे  काचेचा  सुंदर  निमुळता  ग्लास
मग  स्वान्ड्या  ती  संध्याकाळ  हळूहळू  पितो
                               अन  वागतो  एकदम  झक्कास

सकाळी  स्वानंद  एकदम  सिरीयस,  शांत,  सालस
                                                  लेखक  वाटतो
पण  संध्याकाळी  अवखळपणा  त्याच्या  अंगाखांद्यावर
                                                            नाचतो

मग  स्वान्ड्या  उडतो  काय ?  हसतो  काय ?
        रडतो  काय ?  खेचतो  काय ?
म्युझिक  मिळालं  की हलवतो  आपले  बारीक  बारीक
                       हात  पाय  . . .


आता  तर  एकच  घोट  पिऊन  झालेली  असते  'संध्याकाळ'
मग  स्वान्ड्या  मस्तपैकी  pillar ला  रेलून  उभा  राहतो 
अन  ऐटीत  आणखी  एक  घोट  घेतो 
मग  ग्लास  असा  प्रकाशात  उंचावत ,
किती  उरलीये  संध्याकाळ  ते  बघून  घेतो  . . .

अजून  संध्याकाळ  बरीच  उरली  असते
पण  तिला  रात्रीची  कविता  स्फुरली  असते
मग  तिलाही  प्रश्न  पडतो,  कवि  कोण ?
स्वानंद  की  . . .   . . .
असो  . . .

दारूत  सोडा  टाकावा  ना  तशी  हळूच  रात्र  त्या
                                               ग्लासात  पडते
पण  कसय,  सोड्यानी  जरा  नशा  कमी  होते
पण...  रात्र  पडली  ना,  कि जरा  लवकर  चढते

मग  स्वानंद  गाणी  गातो  . . .  विचित्र  गाणी  . . .
स्वानंदी  स्वानंद  कढे  . . .  वगैरे  . . .  वगैरे  . . .

लोकांना  नाही  झेपत,  पण  तो  संध्याकाळ  पिऊन
स्वानंद  घेत  असतो  . . .   . . .

असाच  स्वानंद  चालत  रहातो  रात्रभर  . . . 
संध्याकाळच्या  सोबतीला  . . . 
अन  मग  संपते  संध्याकाळ  . . .  पण

स्वानंद  ठेऊन  देतो  दोन  थेंब  त्या  ग्लासात
फक्त  उद्याच्या  आठवणीसाठी  . . .  . . . 

                                  --  मोहित

Friday, September 30, 2011

एकदा


आकाशाची अथांग निळाई, 
         एकदा डोळ्यांत शोषून घ्यायाचीये;
अन त्या निळ्या डोळ्यांनी, 
         ढगांची मऊ मऊ स्वप्नं पहायचीयेत...

घोळवायचय गळ्यामध्ये, 
         एकदा झऱ्याचं झुळझुळणं;
अनाम कुणाच्या ओढीनं, 
         एकसंध वाहत राहणं...

समुद्राच्या लाटांचा आवाज, 
         कानांमध्ये भरून घ्यायचाय;
मनाला पूर्ण मोकळं करून, 
         त्याच्यामध्ये साठवायचाय...

मोठ्या, उजाड माळरानावरचा, 
         एकटा पिंपळ व्ह्यायचय एकदा;
व्यापून टाकणाऱ्या शांततेत,
         एकटंच सळसळायचय एकदा...

कुणासाठी तरी एकदा, उंच एखाद्या कड्यावरून,
         धबधब्यासारखं झोकून द्यायचय;
टोकदार, माजुर्ड्या खडकांवर,
         निर्भीडपणे कोसळायचय...

भल्यामोठ्या घराच्या, कुठल्याशा कोपऱ्यामधला,
         कच्च अंधार व्ह्यायचय एकदा;
अन भीती बनून कुणाच्यातरी,
         मनाला वेढून घ्यायचय एकदा...

अवसेच्या अंधाऱ्या रात्रीशी एकदा, 
         चांदण्या होऊन बोलायचय;
आपल्या फक्त अस्तित्वानं, 
         तिला मोहरून टाकायचंय...

कुठल्याशा वेड्या कवीची, 
         अनाम कविता व्ह्यायचय एकदा;
अन वाचणाऱ्या प्रत्येकाला, 
         हळुवार कवेत घ्यायचय एकदा...  Wednesday, September 28, 2011

स्वान्ड्यारावांची PhD

(माझ्या पासपोर्ट मिळवण्याच्या अन नंतरच्या PhD application च्या काळात मी सर्वात जास्त जर कुठल्या मित्राकडे रडलो असेन, तर तो अभ्या (अभिषेक) काकडे (उर्फ चोच्या). पठ्ठ्यानी तेव्हा माझं सगळं ऐकून घेऊन, मित्रधर्म पाळला. पण नंतर मात्र त्यानी, या सगळ्या 'प्रकरणा'वरून माझी खेचायचा एकही chance सोडलेला नाही. (थोडक्यात, अजूनही तो मित्रधर्म पाळतोय :) )
तर, या सगळ्या 'भानगडी'वर काहीतरी लिही, असं त्यानी मला हज्जारदा सांगूनही मी अजून तरी काही लिहिलेलं नाहीये. कारण काहीही असो - काही विशेष अंगभूत 'गुणांचा' (जसे, आळस) प्रभाव म्हणा किंवा स्वतःच्या गंडण्याकडे तिऱ्हाईतपणे पाहण्यासाठी लागणाऱ्या मोठेपणाचा अभाव म्हणा. पण आमचे अभ्याराव बाकी जिद्दी आणि हुशार. जिद्दी यासाठी की आमच्या 'कर्तृत्वावर' काहीतरी लिहिलं जावं यासाठीचे प्रयत्न त्यानी सोडले नाहीत. आणि हुशार यासाठी की स्वतः लिहिण्याच्या फंदात काही तो पडला नाही. पण त्यानी माझे सगळे पराक्रम त्याच्या मैत्रिणीला - त्रिपुराला - सांगितले, आणि तिनी चक्क त्यावर एक झक्कास कविता लिहिली! आता अभ्याला Thank you म्हणायला, माझी शौर्यगाथा कथन करण्यामागचे त्याचे विचार फार स्वच्छ होते असं काही मला वाटत नाही :) पण केवळ त्यानी केलेल्या वर्णनावरून - जे किती भयानक असेल हे मी imagine करू शकतो - इतकी सुंदर कविता केल्याबद्दल त्रिपुराला खूप खूप धन्यवाद...!!! )

स्वान्ड्यारावांची PhD

M. Tech. ची धांदल संपता संपताच,
पुढच्या degreeची लागली हाव...
परदेशी जाऊनच करीन PhD,
ठरवून बसले आमचे स्वान्ड्याराव !

केला अर्ज मग पासपोर्टसाठी,
पाहिला टाकून पहिला डाव...
५०,००० तही मिळेना पासपोर्ट तरीही,
भरत राहिले ब्यागा स्वान्ड्याराव !

चालवली घरे वकिल, जज्जांची,
वेळोवेळी घेतली कोर्टात धाव...
थोपटून आपले दंड पोलादी,
PhD साठी राहिले लढतच स्वान्ड्याराव !

ऐटीत दिली पार्टी सांगत,
पुढल्यावेळी असेल नवा गाव...
या वेळीही म्हणू सगळे तसंच,
पार्टी मात्र द्या ... स्वान्ड्याराव !

आभ्या, विशल्या पोचले U.K. त,
बारक्याला मिळाला गडचिरोलीत भाव...
G.R.E. मध्ये काढूनही स्कोर मजबूत,
राहिले बघत वाट स्वान्ड्याराव !

कुठूनही यावा एकदाचा call,
university चे नसेना ऐकीवात नाव...
प्रार्थना शनीला आम्हा पामरांची,
PhD ला जावे आमचे स्वान्ड्याराव !

- त्रिपुरा

Monday, September 5, 2011

गूढ

लपले आहे,
मनात काही खोल, गुढसे;
विचार कोणता डोकाविल,
त्याचे टाकित फासे...

विचार-वादळ भयाण जेव्हा,
मनात उठते;
केंद्र तयाचे तिथेच कोठे,
दडले असते.

अनाम कुणास्तव,
मनास जेव्हा हुरहूर वाटे;
मृदगंधापरी सुगंध सुंदर,
तिथेच दाटे.

भडकुनी वणवा रागाचा,
मन लाही जेव्हा होते;
पेटविणारी ठिणगी पहिली,
तिथेच पडली असते.

हात कुणाचा आहे हाती,
भासे जेव्हा;
उमले सुंदर कळी चिमुकली,
तिथेच तेव्हा.

मनास पुसले,
"सांग मना,
हे गूढ कोणते?"

वदले मन, "हे,
गूढ निरंतन,
तुझ्याप्रमाणे,
स्वतः स्वतःचा,
शोध घेते ! "

Thursday, September 1, 2011

Wednesday, July 27, 2011

बालभारती

पाऊस पडतो रिमझिम जेव्हा,
झाड वडाचे भिजून जाते;
गंध नव्याचा घेऊन पोटी,
पुस्तक भेटायला येते.

कव्हर त्याचे रेखिव खाकी,
रंगित स्टिकर अन त्यावरती;
घेऊन सारे धडे नि कविता,
हळूच हसते, बालभारती !

'फटका' इथला लागत नाही,
'गवतफुला'ही येथे परिमळ;
पण कधि 'गोड हिवाळया'मध्ये,
स्वप्नांचा होतो 'लाल चिक्खल'.

'स्मशानातले' लेवुन 'सोने',
'बुद्ध' येथला 'दर्शन' देतो;
'गर्वा'ने 'कोलंबस' इथला,
'तुतारी' फुंकुनी, गगन भेदितो.

रस्त्यावरची 'दमडी' इथली,
स्वप्नांची पांघरे 'पैठणी';
ज्ञान-तुक्याचे 'अभंग' गाते,
'मनु' येथली, आर्त विराणी...

क्षणांत काही, डोळ्यांमध्ये
आठवणींचे असंख्य मोती;
रेखिव खाकी बुराख्यामागे,
अलिप्त तरिही, बालभारती...

(आठवी नंतर पुस्तकाला कुमारभारती नाव असलं, तरी मराठीचं पुस्तक म्हटलं की बालभारती हेच नाव डोळ्यांसमोर येतं :-) )

Monday, July 25, 2011

एकम - मिलिंद बोकील

मिलिंद बोकील यांच्या एकम या कादंबरीतील काही निवडक संकलित भागाचं अभिवाचन. (मला मान्य आहे कि जरा जास्तच lengthy आहे, पण खूप सुंदर लिहिलंय !)

ज्याला कुणाला लिहायला आवडतं किंवा at least ज्याला कधीतरी, काहीतरी वाचल्यावर 'मी असं कधी लिहीन का?' असं वाटलं असेल त्या प्रत्येकासाठी...

१. काळं कि निळं ?
२. चहा कि कॉफी ?
३. थीम कि थीम्स ?
४. एकटेपणा - शाप कि वरदान ?
५. शाप = वरदान !
६. एकटेपणा
७. लेखक
८. लिखाण
९. एकम...

मनातलं अवकाश!

मळभ विरतं, दिसू लागतं
निरभ्र... आकाश;
दूर कुठे क्षितिजावरती,
मंदसा ... प्रकाश.

वारा नाही पण,
शहारणारा गारवा;
हवेमध्ये दवासारखा,
अनामिक गोडवा.

पिसासारखं हलकं, हलकं,
सहज... सावकाश;
नितळ... निराकार --
मनातलं अवकाश !

Saturday, May 14, 2011

आठवणींच्या कविता ३

(शेवटच्या फिरोदिया नंतरची, नाटकावरची शेवटची कविता. आठवणी खूप होत्या. साडे तीन सुमन करंडक - 'आयला', 'Tax फ्री', 'सांत्वन', 'मृगजळ'; तीन पुरुषोत्तम - 'एक ओंगळ घटना', 'अशाच एका संध्याकाळी', 'एका कथेची गोष्ट'; तीन फिरोदिया - 'त्सुनामीच्या निमित्ताने', 'सदा कदाचित', 'हो! पण...?'. (अजूनही त्या आठवणी आहेत, पण तेव्हा त्या खूप फ्रेश होत्या :-) ) त्यामुळे मनात येईल तसं, flow वगैरेचा फारसा विचार न करता लिहिलंय.)

हो! पण...?

'सदा' काहीतरी भव्य-दिव्य करायचं होतं
फारच थोडं जमलं 'कदाचित'...
तरीही मागची चार वर्षं,
केवढी सुंदर... केवढी अभावित...

Show च्या दिवशी मन उधाण,
'त्या' दिवशी, मात्र 'Tax Free' 'सांत्वन' मिळायचं...
आणि असायची पुढच्या स्पर्धेची हमी;
'आयला' यार, एक दिवस...
मनामधल्या अनंत 'त्सुनामी'

तशातच, 'अशाच एखाद्या संध्याकाळी'
'एक ओंगळ घटना' घडली;
आणि 'मृगजळा'मागे धावताना
'एका कथेची गोष्ट' झाली...
हो! पण...?

वेडं मन अजून एक चान्स मागतंय;
विचारांच्या तळ्यात, स्वप्नांचा समुद्र शोधतंय!

वाटतंय आसामा के पार अजून,
एक फिरोदिया व्हायचा असेल;
सगळी सुंदर स्वप्नं घेऊन,
आपला पेगासीस उडेल

ढगांची formations , इंद्रधनुच स्ट्रिंग आर्ट,
आणि नक्षत्रांच्या लाटेवर 'One Man's Dream' होईल
"तुम्ही नं... तुम्ही खूप मोठी माणसं झालायत"
वावटळीतून आवाज येईल

मनातला आठवणींचा प्रचंड समुद्र
आता डोळ्यांत तळं म्हणून येणार...
"प्रवाहात आणि प्रवाहाविरुद्ध
एकाचवेळी कसं ना पोहणार ?"
...
आता ना, आता आपण senior होणार!
सगळं रुटीन बदलून जाईल...
दररोज सहा वाजता मात्र,
'cultural' ची आठवण होईल!

senior म्हणून जरूर येऊ,
उगाच भरपूर suggestions द्यायला...
आणि त्या प्रत्येक क्षणात,
पुन्हा स्वतःलाच शोधायला!
...
senior म्हणून जाताना,
नाही देऊ शकलोय करंडक;
उलट इथूनच घेऊन चाललोय...
इथला प्रत्येक क्षण, इथली प्रत्येक आठवण.
हो! पण...

डोळे मिटून घेऊ या... नाहीतर, मनातलं सारं,
निसटून जाईल गालांवर;
असंख्य आठवणी, काही सल
राहू देत ना मनात, आयुष्यभर...!


Thursday, March 17, 2011

छोट्याशा नातवाची छोटीशी कविता

रोज, भल्या पहाटे
आजोबा 'आपोआप' उठतात
अन पूजेसाठी बागेतली
फुलं खुडू लागतात

"काय स्वान्दोबा, फिरायला येणार का?"
एकच हाक मारतात
आणि कधीही न उघडणारे माझे डोळे
आज मात्र, तसेच, आपोआप उघडतात

दोन दोन स्वेटर घालून
मग आम्ही फिरायला निघतो
गच्च धुक्यातला एकटा रस्ता
कसला सॉलिड दिसतो

"हे झाड अमुक-अमुक, तो पक्षी तमुक-तमुक"
आजोबा काय काय सांगतात
"मज्जाय की नाही!" म्हणत
कसले गोड हसतात

घरी आल्यावर आज्जी
मस्त गरम उपीट करते
आई हिची मुलागीये ना
मग हिची चव इतकी भारी कशी असते?

दुपारी जेवणात तर
माझी फुल्ल मज्जा असते
आज्जी मला मऊ मऊ
आमटी-भात कालवून देते

आजोबा त्यांच्या ताटातला
दहीभात देतात
"कसाय?" म्हणत
भूर्र्र भुरका मारतात

दुपारी मी स्वयंपाक घरात
भांडी पाडत, खेळत असतो
"लागेल रे, हळू" एवढाच
आजीचा ओरडा असतो

पण त्या आवाजानी
आजोबा मात्र उठतात
"क्रिकेट खेळायचं का?"
स्वतःच मला विचारतात

आमचे आजोबा तर तेंडल्यापेक्षा
भारी क्रिकेट खेळतात
मी कधीही म्हणलं की
लगेच मला batting देतात

संध्याकाळी मग आम्ही तिघं
फिरायला जातो
म्हणजे ते दोघं फिरतात,
मी नुसता हुंदडतो

"इकडे बघ गाडी आहे, तिकडे खड्डा आहे"
आई बाबा नुसते सूचना देत असतात
आणि वर सगळा रस्ताभर
माझा हात पकडतात

इकडे मात्र मी
आजीचा हात पकडतो
"नातू असला की काळजी नसते"
आजीचा नेहेमीचा डायलॉग असतो

"हा आमचा नातू बरं का!"
सगळ्यांना सांगत सुटतात
आणि नेहेमीपेक्षा बहुतेक
जरा जास्तच हसत असतात

रात्री मग दमल्यावर,
छान छान जेवल्यावर,
आजोबा लगेच घोरू लागतात
आज्जी मात्र काहीतरी
सांगत राहते
"आता तू मोठ्ठा झालायस,
हे करत जा, ते नको"
एकटीच बोलू लागते

मग मधेच थांबून विचारते
"मोठेपणी तू कोण होणार?"
तेंडल्या, पायलट, सैनिक, शास्त्रज्ञ...
"आज्जी, मी... मी आजोबा होणार!"

आधी आज्जी खूप हसते
नंतर हळूच म्हणते
"त्याला खूप सोसावं लागतं राजा!"

मला काहीच कळत नाही
नुसती झोप येत असते
आज्जी मात्र मला
नुसतीच थापटत राहते

१३ मार्च २०११
(आजोबांच्या ८१ व्या वाढदिवशी, मामाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी केलेली कविता)

Monday, March 7, 2011

निःशब्द

काळ-वेळ सोडून सारी
कधीकधी मनामध्ये,
खोल खोल विहिरीसारखी
खूप खूप आतमध्ये,

आर्त काही अनामिक,
अलवार पण आकस्मिक;
अशांत अन अस्वस्थ,
बेफिकीर, बेशिस्त;

कुठून कशी दाटून येते,
एक वेडी हुरहूर..
कुंद तरीही धुंद जशी,
पावसाची भुरभूर...

भावनांची हिरवी पानं
भिजून जातात...
विचारांची व्रात्य वादळं
थिजून जातात...

दाटून येतं ढगांचं
धुकं... धुकं...
इवल्याश्या कळीगत
मुकं... मुकं...

वाचलेल्या असंख्य कविता,
एकही ओळ आठवत नाहीये;
डोंगरामध्ये पाऊस पडतोय,
पण एकही ओहोळ झरत नाहीये;

सारं कसं अबोल अबोल,
अव्यक्त...
दूर सोनेरी क्षितीजसुद्धा,
अनासक्त...

डोळ्यांमधून मनातले
निसटून जातायत शब्दं...
इतकं बोलूनही, आसवंसारखेच...
निःशब्द !

Saturday, February 19, 2011

आठवणींच्या कविता २

अशाच दुसऱ्या संध्याकाळी

अशाच एका संध्याकाळी: सुंदर खेळ, जमतो मेळ, सारं जग आपलं असतं;
अशाच दुसऱ्या संध्याकाळी: काही फसतं, बहुतेक सरतं, थोडं उरतं...

अशाच दुसऱ्या संध्याकाळी... कुणीही साद न घालता,
अपोआप मनातला आठवणींचा पडदा उघडतो;
मनामधला भाव नकळत डोळ्यांमधून निसटतो...

आठवतात पंधरा ओडीशन्स, कोणी आत, बाहेर कोणी;
नाटकासाठी तरीही झटतो, डोळ्यांमधलं लपवत पाणी...
आठवतं झापलेलं - मोठा आवाज, टायमिंग, बेअरिंग, enegy;
आणि रोज रोज खाऊन आलेली, पाव-भाजीची alergy ...

एक संपतो, दुसरा विचार म्हणतो 'मी आत येऊ का ?'
अरे 'बे विंडो' चांगली होती, पण ठेवला मल्टी पर्पज झोका...
प्रसंग आहे परंतु बाका...
मनातले विचार 'टकबक टकबक',
पटत नाहीयेत, काढून टाका...
वाटतं उगाच कुठूनतरी, character ची एन्ट्री होईल;
धाडधाड त्याच्यापाशी मनामधलं बोलता येईल...

पण 'भरत'च्या कट्ट्या वरची निःशब्द शांतता,
जणू कुठूनतरी जांभळा साप आलाय;
हळुवार, अवखळ वाऱ्यानी, मनातल्या प्राजक्ताचा सडा
कुठल्या कुठे उडून गेलाय...
वाटतं दूर निघून जावं, लागणार नाही इथे निभाव;
फक्त इथे असण्याचाही, मनावरती पडतो प्रभाव...

स्टार, बाण, फुल्या, कंस -
मनामध्ये वेगळीच स्क्रिप्ट सुरु होते;
अन अशाच दुसऱ्या संध्याकाळी सुद्धा,
उन्हाची सुंदरशी तिरीप पडते...!

Thursday, February 17, 2011

आठवणींच्या कविता १

एक ओंगळ कविता

(पहिल्या 'पुरुषोत्तम'च्या रिझल्ट नंतर लिहिलेली कविता...)

कितीही लक्ष दिलं, तरी डोक्यात काहीही जात नव्हतं;
लिहायचं ठरवलं, तर पेनच उमटत नव्हतं...
लायब्ररी गच्च भरली होती, कॅंटीनचे कट्टे होते मोकळे;
मेक फ्लोअर, ऑडी... सुन्न सुन्न होते सगळे...
कुठेतरी मनामध्ये सबमिशनचा लोड होता;
कॅंटीनचा रोजचा चहा, काल मात्र आगोड होता...
काल घरी जाताना एकही मुलगी दिसली नाही;
पेपर मधली मॉडेलसुद्धा, काल अजिबात हसली नाही...

घरी आल्यावर आठवडाभराच्या आठवल्या टेस्ट;
म्हटलं आता अभ्यास, टाईम नाही करायचा वेस्ट ...
पण परीक्षेसाठी वाचू म्हटलं, तर पोर्शनच माहित नाही;
जरनल लिहायचं, तर रायटप सापडत नाही...
शेवटी ठरवलं, एवढा प्रयोग झालाच पाहिजे कम्प्लीट;
निर्धारानी बसलो, पण तेवढ्यात गेले लाईट...

कॅण्डलच्या प्रकाशात मग उगाचच बसलो होतो,
स्वतःशीच चर्चा करत...
Black-out पूर्ण झाला की मगच उठायचं,
उगाचच आठवलं परत परत...
मग ठरवलं, झकास पैकी म्हणू गाणी,
कसं कोण जाणे, पण डोळ्यात दाटलं होतं पाणी...

प्रत्येक दिवस, प्रत्येक स्ट्रेच, प्रत्येक क्षण आठवला,
स्ट्रेचच्या आधी केलेला प्रत्येक पण आठवला...
Energy, मोठा आवाज, टायमिंग, बेअरिंग;
एन्ट्री, एक्झिट प्रत्येकवेळी, फक्त फक्त दुसरी विंग...
घाबरायचं नाही, बिनधास्त, प्रत्येकवेळी घ्यायचा लाईट
फोकस मुळीच सोडायचा नाही, ग्रीन रूम मध्ये बसायचं क्वाईट...
आठवल्या चुकलेल्या टाळ्या, आठवला दोन दिवसात बसवलेला चौथा सीन;
आठवलं म्हणलेलं, 'पाहिलंस... मी तुमचा बाप', कडक तिसरा सीन...
आठवले एकत्र खाल्लेले डबे, आठवलं ज्ञानेश्वर, जोगराम, सुहाग;
आणि उगाचच केलेलं चर्वण, कॅंटीनचा क्रीमरोल टपरीपेक्षा का महाग ?


मघाशी रायटप शोधताना वर आलेला 'गोष्टीचा' कागद,
उगाचच हातात आला;
मग मात्र आसवांवरचा संयम, पूर्ण सुटला...
कळलं आता मेणबत्तीचा प्रकाशसुद्धा धोका देईल,
भिंतीवरचं घड्याळ उगाच साडे-आकराचा ठोका देईल!

झटकन मान फिरवली, डोळे गच्च मिटून घेतले;
गालावर ओघळलेले दोन थेंब, तेवढ्यात बहुतेक चमकून गेले...
'काय करतोयस ?' आई म्हटली, म्हटलं 'जरा झोपतो आत',
विचार थांबतील दोन क्षण, मी उठण्याची वाट पहात...
कॉटवर झोपताना गुडघा दणकन आपटला,
म्हटलं 'सैतान त्रिफोन तुझ्यामुळेच !'
मनातले विचार, खरंच... खुळेच...

लाईट आले, चेहेरा झाकत म्हणालो 'शीट !'
मुझिक, लाईट्स, सेट, डायरेक्शन.. सगळंच होतं की परफेक्ट फिट...
तेवढ्यात आई म्हणाली, 'जरा घे खाऊन',
भरले डोळे, ओले गाल, म्हटलं 'येतो हात धुवून'...
जेवायला बसलो, तर ताटात होतं पिठलं;
आईला कसं सांगणार, जेवणावरचं लक्ष दुपारीच उडलं...

पहिला घास घेतानाच खणाणला फोन,
'कसं झालं नाटक?', आजीचा टिपिकल टोन...

म्हटलं आजी चांगलं झालं
पण आमचं रिकामं खातं,
एक बक्षीस आहे बरं का
बाकी बहुतेक परीक्षकांशी जुळलं नाही नातं...

आजी म्हणाली 'अरे वेड्या, प्रयत्न करत रहा...
अरे आज नाही तर उद्या मिळेल,
काहीतरी नवीन, चांगलं केल्याचं समाधान तर पहा'
मी म्हटलं 'खरय, प्रयत्न करणं आमचं काम आहे,
आता फक्त अडीच महिने आराम आहे !'

फोन ठेवला, कळलं, च्यायला आपण खरंच सांगितलं...
"माणसाचा स्वभाव सूर्यप्रकाशासारखाच, न बदलणारा"
हे त्या 'माणसांना' का नाही कळलं ??

Wednesday, February 2, 2011

नकार कि...

मनात माझ्या स्पंदनांचा ललकार होता
नकार कि, तुझा सये तो... होकार होता ?

असायचो कितीकदा त्या, गर्दीतही मी एकटा
काल एकांतातही का, सखे तुझा, आधार होता ?

मनातली प्रत्येक माझ्या, व्यथा मला, तुझ्यात दिसली,
काल का इतुका तुझा, चेहेरा सखे, निर्विकार होता ?

भासली आसवेही माझी, खळीत तुझिया, मोत्यांपरी
काल का, वेड्या कळीला, इवल्या दवाचा भार होता ?

हसणे तुझे कि, स्फुरायचा तो, खळाळता झरा इथे
काल स्मितहास्याताही का, सळाळता ध्रोंकार होता ?

ढळायचा अश्रू तुझा अन, चूक माझी उमगायचो मी
काल का मग एवढा, हुंदका हळुवार होता ?

अनेकदा सुरांत माझ्या, वाहिलेस तू स्वतःला
काल का भैरवीत माझ्या, श्वास तुझा, गंधार होता ?

असायचो सम्राट मी अन, शब्द तुजला, सुनवायचो मी
गुलाम झालो काल पुरता, कविते तुझा दरबार होता !

तुझ्यामुळे अस्तित्व माझे, नाही तुला, पुसायचे मी
कळवायचा कवीनेच त्याचा, कविते तुला, होकार होता !

Thursday, January 20, 2011

अपूर्वाई

एक अशीच संध्याकाळ, आकाशाची निरभ्र निळाई...

पश्चिमेचा पवन आणतो एक पांढराशुभ्र ढग, हळुवार...
आणि मार्गस्थ भास्कर त्याला लेववतो, भावनेची भरजरी किनार... तेवढ्याच, हळुवार !
दिनकराच्या चेहेऱ्यावरचं शेवटचं हास्यं, फिक्कट तांबूस... त्याचा केवढा प्रभाव...
अचानक त्या निळाईतल्या निरागस मेघावार होतो रंग-सुमनांचा वर्षाव...
आठवणींनी आणि स्वप्नांनी मोहोरतं त्याचं मन... आणि जन्मतो... एक जलद...
केवढा अलगद...!

आता हा बरसेल... संध्येला पडतयं एक इंद्रधनुष्यी स्वप्नं...
अन तो सहजसुंदर भाव, तिच्या मुखावर इवलीशी कळी उमटवून गेलाय...
पण, पण... भरजरी शालू नेसलेल्या, अन सहस्र रंगांनी सजलेल्या,
त्या संध्येच्या गालावरची गोड खळी पाहून...
सहजपणे तो मेघ तिच्या मागे मागे चालू लागलाय...
तिच्या नकळत, आणि... त्याच्याही...

...
...
...

उरलीये... उरलीये आता अथांग आकाशाची निरभ्र निळाई...
अन सोबतीला, त्या चित्रमय क्षणांची केवळ अपूर्वाई...!