Monday, March 7, 2011

निःशब्द

काळ-वेळ सोडून सारी
कधीकधी मनामध्ये,
खोल खोल विहिरीसारखी
खूप खूप आतमध्ये,

आर्त काही अनामिक,
अलवार पण आकस्मिक;
अशांत अन अस्वस्थ,
बेफिकीर, बेशिस्त;

कुठून कशी दाटून येते,
एक वेडी हुरहूर..
कुंद तरीही धुंद जशी,
पावसाची भुरभूर...

भावनांची हिरवी पानं
भिजून जातात...
विचारांची व्रात्य वादळं
थिजून जातात...

दाटून येतं ढगांचं
धुकं... धुकं...
इवल्याश्या कळीगत
मुकं... मुकं...

वाचलेल्या असंख्य कविता,
एकही ओळ आठवत नाहीये;
डोंगरामध्ये पाऊस पडतोय,
पण एकही ओहोळ झरत नाहीये;

सारं कसं अबोल अबोल,
अव्यक्त...
दूर सोनेरी क्षितीजसुद्धा,
अनासक्त...

डोळ्यांमधून मनातले
निसटून जातायत शब्दं...
इतकं बोलूनही, आसवंसारखेच...
निःशब्द !

3 comments:

  1. Boss..Tussi Great Ho...Kasli Bhari Kavita aahey...
    nice...Chotya Chotya olinchi sundar kavita...short and sweet vatli...It must be an art to write short and sweet poems...

    ReplyDelete
  2. अहा! खरंच, शब्दा-शब्दात खोचून भरलेल्या भावना..सहीच आहे कविता
    एका निशब्द क्षणाचं चित्र अगदी थांबून, निरखून पाहिल्या सारखं

    ReplyDelete
  3. स्वान्ड्या, खूप सुंदर कविता आहे... साक्षात मंगेश पाडगावकर वाचतोय असंच वाटतंय... आठवड्याला १ तरी लिहीत जा...

    ReplyDelete