झाड वडाचे भिजून जाते;
गंध नव्याचा घेऊन पोटी,
पुस्तक भेटायला येते.
कव्हर त्याचे रेखिव खाकी,
रंगित स्टिकर अन त्यावरती;
घेऊन सारे धडे नि कविता,
हळूच हसते, बालभारती !
'फटका' इथला लागत नाही,
'गवतफुला'ही येथे परिमळ;
पण कधि 'गोड हिवाळया'मध्ये,
स्वप्नांचा होतो 'लाल चिक्खल'.
'स्मशानातले' लेवुन 'सोने',
'बुद्ध' येथला 'दर्शन' देतो;
'गर्वा'ने 'कोलंबस' इथला,
'तुतारी' फुंकुनी, गगन भेदितो.
रस्त्यावरची 'दमडी' इथली,
स्वप्नांची पांघरे 'पैठणी';
ज्ञान-तुक्याचे 'अभंग' गाते,
'मनु' येथली, आर्त विराणी...
क्षणांत काही, डोळ्यांमध्ये
आठवणींचे असंख्य मोती;
रेखिव खाकी बुराख्यामागे,
अलिप्त तरिही, बालभारती...

(आठवी नंतर पुस्तकाला कुमारभारती नाव असलं, तरी मराठीचं पुस्तक म्हटलं की बालभारती हेच नाव डोळ्यांसमोर येतं :-) )