Wednesday, July 27, 2011

बालभारती

पाऊस पडतो रिमझिम जेव्हा,
झाड वडाचे भिजून जाते;
गंध नव्याचा घेऊन पोटी,
पुस्तक भेटायला येते.

कव्हर त्याचे रेखिव खाकी,
रंगित स्टिकर अन त्यावरती;
घेऊन सारे धडे नि कविता,
हळूच हसते, बालभारती !

'फटका' इथला लागत नाही,
'गवतफुला'ही येथे परिमळ;
पण कधि 'गोड हिवाळया'मध्ये,
स्वप्नांचा होतो 'लाल चिक्खल'.

'स्मशानातले' लेवुन 'सोने',
'बुद्ध' येथला 'दर्शन' देतो;
'गर्वा'ने 'कोलंबस' इथला,
'तुतारी' फुंकुनी, गगन भेदितो.

रस्त्यावरची 'दमडी' इथली,
स्वप्नांची पांघरे 'पैठणी';
ज्ञान-तुक्याचे 'अभंग' गाते,
'मनु' येथली, आर्त विराणी...

क्षणांत काही, डोळ्यांमध्ये
आठवणींचे असंख्य मोती;
रेखिव खाकी बुराख्यामागे,
अलिप्त तरिही, बालभारती...

























(आठवी नंतर पुस्तकाला कुमारभारती नाव असलं, तरी मराठीचं पुस्तक म्हटलं की बालभारती हेच नाव डोळ्यांसमोर येतं :-) )

6 comments:

  1. :) खूपच सुंदर....!

    ReplyDelete
  2. mast!!! ....ekdam lucid language madhye sagalya kavitanchi naava chaan gunfali aahes!!

    ReplyDelete
  3. स्वान्ड्या, मराठीचे धडे, कविता हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळेतले दिवस सुंदर बनवण्यात मराठीचा फार मोठा वाटा होता. आजही आपल्या पिढीचा असा मुलगा/मुलगी शोधणे अवघड आहे ज्याला 'कणा' पाठ नाही. आजची पुस्तके पाहून त्यात आपल्या वेळची मजा नाही असे वाटते.
    खूप सुंदर कविता झाली आहे. खूप खूप आठवणी पुन्हा दाटून आल्या...

    ReplyDelete