Friday, September 30, 2011

एकदा


आकाशाची अथांग निळाई, 
         एकदा डोळ्यांत शोषून घ्यायाचीये;
अन त्या निळ्या डोळ्यांनी, 
         ढगांची मऊ मऊ स्वप्नं पहायचीयेत...

घोळवायचय गळ्यामध्ये, 
         एकदा झऱ्याचं झुळझुळणं;
अनाम कुणाच्या ओढीनं, 
         एकसंध वाहत राहणं...

समुद्राच्या लाटांचा आवाज, 
         कानांमध्ये भरून घ्यायचाय;
मनाला पूर्ण मोकळं करून, 
         त्याच्यामध्ये साठवायचाय...

मोठ्या, उजाड माळरानावरचा, 
         एकटा पिंपळ व्ह्यायचय एकदा;
व्यापून टाकणाऱ्या शांततेत,
         एकटंच सळसळायचय एकदा...

कुणासाठी तरी एकदा, उंच एखाद्या कड्यावरून,
         धबधब्यासारखं झोकून द्यायचय;
टोकदार, माजुर्ड्या खडकांवर,
         निर्भीडपणे कोसळायचय...

भल्यामोठ्या घराच्या, कुठल्याशा कोपऱ्यामधला,
         कच्च अंधार व्ह्यायचय एकदा;
अन भीती बनून कुणाच्यातरी,
         मनाला वेढून घ्यायचय एकदा...

अवसेच्या अंधाऱ्या रात्रीशी एकदा, 
         चांदण्या होऊन बोलायचय;
आपल्या फक्त अस्तित्वानं, 
         तिला मोहरून टाकायचंय...

कुठल्याशा वेड्या कवीची, 
         अनाम कविता व्ह्यायचय एकदा;
अन वाचणाऱ्या प्रत्येकाला, 
         हळुवार कवेत घ्यायचय एकदा...  



6 comments:

  1. स्वन्ड्याराव, तुमच्या कवितेला दिवसेंदिवस बहार येत चाललाय... आणि मी या प्रवासाचा साक्षी आहे याचं खूओप समाधान वाटतंय... खूपच सुंदर! मी आता म्हणू शकतो की माझ्या वाचनात आलेल्या सर्वोत्तम कवींपैकी तू एक आहेस...
    मानवी भावनांना निसर्गाचे रूपक एवढं सुंदर दिलेलं मी पाहिलं नाही.

    ReplyDelete
  2. aaha! kaslyaa kalpanaa! aani yevdhi apratim rachanaa! khoopach aawadli

    ReplyDelete
  3. Arey kasli bhari kavita aahey Swandya!!! congrats... I must say ki hi kavita tujhya vyaktimattvala shobhnari aahey....Khupach chaan..

    ReplyDelete