Saturday, November 12, 2011

समुद्र


(मोहितच्या अजून एका सुंदर कवितेचं अभिवाचन करायचा प्रयत्न केलाय, आणि त्याचा विडीयो पोस्ट केलाय. सोबत कविता सुद्द्धा पोस्ट करतोय.)

आज समुद्र येईल स्वप्नात तुझ्या
अलगद पाउस झेलत असणारा
त्याच्या लाटांवर तुझी स्मिते
... सहज हेलकावत असणारा....

म्हणशील तू हा इतका खारट
तरी हसतो इतका गोड कसा ?
उत्तरातही स्मित देऊनी
नुसता गप्प गप्प बसणारा...

मग, सहजपणे तू त्याच्याशी
गप्पा मारू लागशील...
तेव्हा, लाटांइतक्याच हळुवारपणे,
सारं तुझं ऐकून घेणारा...

असंख्य विचारांनी भरलेलं तुझं मन,
त्याच्यासारखंच... अथांग !
अन, बोलता बोलता भरून आलेले तुझे डोळे,
लाटांवरून दूर दूर, क्षितिजापर्यंत नेणारा...

मग तू होशील गप्प गप्प,
डोळे मात्र बोलू लागतील...
तेव्हा, ओघळणारा तुझा प्रत्येक अश्रू,
अलगदपणे टिपणारा...

शेवटी सारं बोलून झाल्यावर,
हलकं हलकं वाटल्यावर,
...पुन्हा म्हणशील तू हा इतका खारट
तरी हसतो इतका गोड कसा ?
उत्तरातही स्मित देऊनी
नुसता गप्प गप्प बसणारा...

डोळे कोरडे झाल्यावर,
मिस्कील हसशील स्वतःवर
हीच भावनांची भारती ओहोटी
शिंपल्या शिंपल्यात जपणारा....

एकटक त्याच्याकडे बघून
थोड गंभीर मनात म्हणशील
आपलेच अश्रू टिपून टिपून
हा इतका खारट होणारा? ...

तरी शांत शांत भासणारा....

मग म्हणणार नाहीस तू..
हा इतका खारट, तरी हसतो इतका गोड कसा ?
तरी नेहमीसारख स्मित देऊन
नुसत गप्प गप्प बसणारा...

आज समुद्र येईल स्वप्नात तुझ्या...

                             -- मोहित




No comments:

Post a Comment