Monday, October 31, 2016

कवितेस...

का सुकून गेले नयनांमधले पाणी ?
का विरून गेलीस कविते पानोपानी ?
शतरंगांनी नटलेल्या संध्याकाळी,
का पांघरली सावलीच या शब्दांनी ?

कित्येक भेटले शब्द घेऊनि भाव
कधी सूर निरागस, घेऊन आले गाणी!
अज्ञात शांतता मनात घुमली जेव्हा,
तू होतीस कविते, अशी उभी साथीनी!

का गेलीस सोडून आज मला तू कविते,
का दिले सोडूनि, वाऱ्यावर शब्दांनी?
टाकून मला हा असा एकटा येथे,  
हे सूर निघाले, आपल्याच वाटांनी...

का रुसलीस कविते निघून ये तू आता
हि तोड शांतता, गुंजारव गीतांनी
आठव तू आपण आळवलेली गाणी,
ये होऊन कविते, डोळ्यांमधले पाणी!

3 comments:

  1. atishay surekh! ashich avastha zali hoti tevha hi lihili ahe - http://shantanubhat.blogspot.com.au/2007/11/blog-post.html
    (mazi jahiratbaaji mhan hawa tar). tyatla kadwa 1,3 ani 5 hya arthacha ahe, pan nantar natkasathi ghyaychi hoti mhanun expand keli ani thodi artha badalnari kadwi ghatli :(

    ReplyDelete
  2. कविस...

    तेथेच होते मी मागे, तू वळून बघितले नाही
    सोडली नव्हती मी साथ तुझी कधीही
    ओठात तुझिया होते कोंडले शब्द
    तूच झाला होता दाबून ओठ निशब्द

    शब्दाशब्दांत तेव्हाही दडले होते भाव
    सूर निरागस गात होते गाणी
    अशांत तुझ्या मनात घुमत होती वाणी
    मी तेथेच होते द्यावया तुझं साथ

    सोडून तुजला मी गेले नव्हते कधीही
    तूच निघाला होता होऊन वाऱ्यावर स्वार
    शब्दानेही एका न विचारता मज
    सोडून मज एकटे तू निघून गेला आपुल्या वाटे

    मी रुसले नव्हते कधी तुजवर
    तूच फिरवली होती पाठ आजवर
    आणून आता डोळ्यात पाणी
    आपण गाऊ आठवणीतील गाणी

    ReplyDelete