Saturday, December 15, 2012

भरले

भरले नभ भरले, भरले नभ भरले
अन आसमंत हे क्षणात कोठे विरले ?
भरले नभ भरले, भरले नभ भरले ...

त्या कृष्ण ढगांनी केली काळी माया
अन सोडून गेल्या पायांमधल्या छाया,
पांघरून वरुनि काळा कातर शेला
तो तेजस्वीही अज्ञातात बुडाला,
अन दूर कुठे ते क्षितिजही आज हरवले ?

भरले नभ भरले, भरले नभ भरले ... 

या सागरास हा एकच इथे किनारा
ही क्षुब्ध वाळु अन स्तब्ध स्तब्ध हा वारा,
तो शोधे जेव्हा एक वेगळी वाट
तेव्हाच उमटते उंच एकटी लाट,
का उठले पाऊल सावकाश विरघळले ?

भरले नभ भरले, भरले नभ भरले ...
 
आभाळ भासते अता वेडे शून्य
तरीही त्यापुढती सारे क्षूद्र, नगण्य,
ते स्वतःच देई स्वतःस आता भोज्या
अन वाढत जाई अथांग त्याची त्रिज्या,
भागिले मनाला त्याने, अगणित उरले ...
 
भरले मन भरले, भरले मन भरले
भरले मन भरले, भरले मन भरले ...
हे क्षणात कुठुनी थेंब दोन ओघळले ?
भरले नभ भरले, भरले नभ भरले ...
भरले मन भरले, भरले मन भरले ...
भरले नभ भरले, भरले नभ भरले ... 

8 comments: